चंद्रपूर जिल्हाराष्ट्रीयसामाजिक

स्वाभिमानी भारतीयांना वृद्धपकाळात देखील ताठ मानेने जगायला मदत करणारी योजना: ना. हंसराज अहीर, केंद्रीय गृहराज्यमंत्री

चंद्रपूरमध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शानदार शुभारंभ

चंद्रपूर (प्रतिनिधी) :आयुष्याच्या उत्तरार्धात ताठ मानेने जगता यावे यासाठी सर्वसामान्यांच्या कुटुंबाची जाणीव असणाऱ्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही स्वाभिमानाची योजना असल्याचे प्रतिपादन देशाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आज येथे केले.त्यांच्या अध्यक्षतेखाली आज चंद्रपूरमध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शानदार शुभारंभ झाला.
देशभर आज प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात या योजनेमध्ये अनेक असंघटित क्षेत्रातील कामगारांनी नोंदी करण्यात आल्या. कॉमन सर्विस सेंटरने ( सीएससी ) या कार्यक्रमाच्या स्थळी देखील नोंदणीची व्यवस्था केली होती. नोंदी करण्यात आलेल्या श्रमिकांना यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. अहीर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या श्रमिकांशी संवाद साधतांना अहिर यांनी वृध्दापकाळामध्ये अतिशय सन्मानाने काम करता यावे व ताठ मानेने जगता यावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही अभिनव योजना असून जिल्ह्यातील प्रत्येकाने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या वय वर्ष 18 ते 40 दरम्यानच्या कामगारांचा समावेश करण्यात आला आहे. त्याचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच जो कर्मचारी राज्य विमा निगम, भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचे सभासद नसेल अशा सर्व श्रमिकांना यामध्ये आपली नोंदणी करता येते.आधार कार्ड ,बँक पासबुक, कुटुंबामध्ये कोणा एकाकडे असणारा मोबाईल फक्त यासाठी आवश्यक आहे.

या योजनेतून वय वर्षे साठ पूर्ण केल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये मानधन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. लाभार्थी कामगाराचा मृत्यू झाल्यास, त्याच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरू ठेवता येणार आहे. तसेच लाभार्थ्यास या योजनेमधून स्वेच्छेने बाहेर पडायचे झाल्यास जमा केलेल्या अंशदान व्याजाची रक्कम देखील परत मिळणार आहे. योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र लाभार्थी कामगारास त्याच्या वयानुसार पहिल्या मासिक अंश दानाची रक्कम, अर्थात योजनेत सहभाग केल्यावर पहिली मासिक किस्त रोखीने अदा करावी लागेल. त्याबाबतची रक्कम भरणा केल्याची पावती संबंधित नागरी सुविधा केंद्राकडून लाभार्थीस देण्यात येईल.
योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थ्याला कोणतेही शुल्क आकारणी केली जाणार नाही. केंद्र सरकारने वयानुसार यासंदर्भात मासिक वर्गणीचा तक्ता देखील जाहीर केला आहे. 18 ते 40 या वयोगटात मासिक वर्गणी किती भरायची हे देखील यामध्ये निश्चित केलेले आहे. लाभार्थी जितका मासिक भरणा करेल तेवढीच रक्कम केंद्र शासन देखील त्यांच्या खात्यामध्ये दरमाह जमा करणार आहे.

नियोजन भवनात आज झालेल्या या कार्यक्रमाला महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, सभापती ब्रिजभूषण पाझारे, जिल्हा परिषद सदस्य सोयाम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले,उपमहापौर अनिल फुलझेले, शीलाताई चव्हाण, रमेश पवार,राजेंद्र खांडेकर, माजी नगराध्यक्ष राऊत व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सीएससीचे विभागीय समन्वयक निलेश कुंभारे यांनी केले. वयाच्या 60 वर्षानंतर नियमित पेन्शन मिळावे अशी ही योजना असून यासाठी दर महिन्याला लाभार्थ्याला आपला हिस्सा बँकेच्या अकाउंटमध्ये जमा करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी देखील यावेळी संबोधित केले.असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी व्यक्त केले. महापौर अंजलीताई घोटेकर यांनी यावेळी संबोधित करताना वृद्धापकाळाने श्रम शक्ती कमी होते. अशा वेळी आर्थिक आधार राहावा यासाठी ही अतिशय महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आली असून याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी ब्रिजभूषण पाझारे यांनी देखील गरिबातील गरीबाला ही योजना अतिशय उपयोगी असल्याचे स्पष्ट करून जिल्ह्यात या संदर्भातील नोंदणी गतीने करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित श्रमिकांना संबोधित करताना अहिर यांनी समाजातील सर्व घटकांना, श्रमिकांना याचा लाभ मिळणार आहे. जे लोक अंगमेहनतीचे काम करतात व ज्यांचा उदरनिर्वाह रोजच्या कामावर अवलंबून आहे ,अशा सर्व घटकांना पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना या योजनेतून पेन्शन मिळणार आहे. यामध्ये कोणतेही अनुदान नसून तुम्ही निर्धारित केलेले पैसे दर महिन्याला भरल्यानंतर सरकार देखील सरळ-सरळ 50% त्यामध्ये आपले रक्कम भरणार आहे.त्यामुळे या योजनेचा लाभ आपल्या वृद्धापकाळात ताठ मानेने जगण्यासाठी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या योजनेसोबतच त्यांनी आरोग्य योजनेमध्ये महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्याने उत्तम काम केल्याबद्दल कॉमन सर्व्हिस सेंटरच्या सर्व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. सामान्य कुटुंबामध्ये गंभीर आजार आल्यानंतर एक प्रकारचे कौटुंबिक संकट उभे राहते. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माझ्या देशात कोणीच विना उपचार राहणार नाही, अशी घोषणा केली आहे. त्यामुळे जन आरोग्य योजनेतून मोठ्या प्रमाणात मदत होत असून याचा लाभ देखील घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन उद्धव पुरी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सीएससीचे विभागीय समन्वयक निलेश कुंभारे, जिल्हा समन्वयक रमजान शेख तसेच कॉमन सर्व्हिस सेंटरच्या अन्य कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button