प्रशासकीयब्रेकिंग न्युज

‘वेव्हज्’ सारख्या सुंदर उपक्रमाचा भाग असल्याचा अतिशय आनंद – हेमा मालिनी

आठवडा विशेष टीम―

वेव्हज् परिषद – २०२५

  • कला आणि व्यावसायिक सिनेमा यामध्ये भेदभाव नाही – लोकांच्या हृदयाला स्पर्श करतं ते कथाकथन – मोहनलाल
  • अभिनय हे माझं बालपणापासूनचं पहिलं प्रेम आहे – चिरंजीवी
  • ‘महान व्यक्तिमत्वे आणि त्यांचा वारसा यावरील चर्चेने वेव्हज् २०२५ चा प्रारंभ

मुंबई, दि. ०१: जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेची जियो वर्ल्ड सेंटरमध्ये ‘महान व्यक्तिमत्वे आणि त्यांचा वारसा’  यावरील चर्चेने अतिशय दिमाखदार सुरुवात झाली. या सत्रामध्ये भारतातील नामवंत सिनेकलावंतांनी याविषयावरील चर्चासत्रात सहभाग नोंदवला.

या उद्घाटन कार्यक्रमातील परिसंवादात प्रख्यात अभिनेत्री हेमा मालिनी, मोहनलाल आणि चिरंजीवी यांसारखे नामवंत सिनेकलाकार सहभागी झाले होते तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेते अक्षय कुमार यांनी केले.

यावेळी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी या उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. त्या म्हणाल्या, “ भारत सरकारचा हा अतिशय सुंदर उपक्रम आहे, याचा एक भाग असल्याचा मला अतिशय आनंद होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि त्यांचे नेतृत्व यामुळे वेव्हज् हा सृजनकार आणि नवोन्मेषकर्त्यांसाठी एक उल्लेखनीय मंच बनला आहे.

प्रसिद्ध मल्याळम अभिनेते मोहनलाल सिनेमाच्या विकसित होत असलेल्या स्वरूपाबद्दल म्हणाले की, समांतर सिनेमा आणि मनोरंजनासाठीचा सिनेमा यामध्ये सूक्ष्म फरक आहे, कारण समांतर सिनेमांमध्येही मनोरंजनाचे मूल्यदेखील असते. “मी कलात्मक आणि व्यावसायिक चित्रपटांमध्ये फरक करत नाही. ते एक प्रकारचे कथाकथन आहे, जे लोकांच्या हृदयाला स्पर्श करत असते”.

प्रख्यात अभिनेते चिरंजीवी यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीच्या प्रवासाबद्दल हृदयस्पर्शी आठवण सांगितली, ज्यामध्ये सिनेमावरील अढळ प्रेम आणि उत्कृष्ट योगदानासाठी अथक प्रयत्न सर्वांनीच अनुभवले. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील धडपड आणि मेहनतीचा उल्लेख करताना ते म्हणाले, “लहानपणापासूनच अभिनय हे माझे पहिले प्रेम राहिले आहे. मी नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या इच्छेने प्रेरित असे. एक चांगला अभिनेता बनण्यासाठी मी कोणती अनोखी गोष्ट करू शकतो?” असे मी सतत स्वतःला विचारत असे.

प्रामाणिक कामाबद्दलच्या वचनबद्धतेवर त्यांनी विशेष भर दिला. “प्रेक्षकांनी मला नेहमीच ‘त्यांच्यातील एक’ अशा रूपात पाहावे अशी माझी इच्छा होती. म्हणूनच मी शक्य तितका नैसर्गिक आणि प्रामाणिक अभिनय करण्याचा प्रयत्न करतो,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या कलेला, त्यांच्यातील अभिनेत्याला घडवणाऱ्या दिग्गजांप्रति त्यांनी आदर व्यक्त केला. मिथुन चक्रवर्ती, अमिताभ बच्चन आणि कमल हसन यांसारख्या सिनेमा जगतातील आदर्श कलाकारांचा त्यांच्यातील अभिनेत्याच्या जडणघडणीवर खोलवर प्रभाव असल्याचे चिरंजीवी म्हणाले.

०००

सागरकुमार कांबळे/ससं/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button