प्रशासकीयब्रेकिंग न्युज

एथ ज्ञान हें उत्तम होये (भाग-१)

आठवडा विशेष टीम―

भगवद्गीतेतील ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ हा एक प्रसिद्ध श्लोक आहे. तितका या श्लोकाचा उत्तरार्ध प्रसिद्ध नाही. वास्तविक अर्थनिश्चितीसाठी संपूर्ण श्लोक, त्याच्या पूर्वीचे आणि नंतरचे श्लोक, त्यांचे संदर्भ माहिती असणे आवश्यक असते. असे असले तरी, बऱ्याचदा अशी प्रसिद्धी अप्रसिद्धी होत असते. याचा प्रत्यय ज्ञान व्यवहारात येतो, तसाच ‘ज्ञानेश्वरी’च्या अभ्यास परंपरेतही येतो.

या विषयाकडे वळण्यापूर्वी काही बाबी पाहाव्या लागतात. ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ या श्लोकावर ‘ज्ञानेश्वरी’त आठ ओव्यांचे निरूपण येते. त्यातील दुसऱ्या ओवीत ज्ञानदेव म्हणतात, ‘एथ ज्ञान हें उत्तम होये। आणिकही एक तैसें के आहे। जैसे चैतन्य कां नोहो ।। दुसरें गा’ (४.७९) चैतन्य एकच असते, दुसरे नाही. तसे इहलोकी ज्ञान हे उत्तम, त्याच्या सारखे आणखी काही नाही. पुढे ते म्हणतात, सूर्याचे प्रतिबिंब तेजस्वी असले तरी ते सूर्याच्या कसोटीला लावता येईल का ? आकाशाला कवेत घ्यायला गेल्यानंतर त्याला कवेत घेता येईल का ? पृथ्वीच्या तोलाची उपमा सापडली तरच ज्ञानाला उपमा सापडेल. या सर्व ओव्यांतून ज्ञानाला दुसऱ्या कशाची उपमा देता येणार नाही, अशी ज्ञानदेवांनी ज्ञानाची थोरवी सांगितली आहे. ती ज्ञानसंन्यासयोगाचे निरुपण करताना वर्णिली आहे.

ज्ञानदेव हे योगी, तत्त्वज्ञानी, संत कवी आणि वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक होते. त्यांचा जीवनकाल इ.स. १२७५ ते इ. स. १२९६ असा मानला जातो. ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’, ‘चांगदेव पासष्टी’, तसेच काही अभंगांची निर्मिती केली. आज ‘ज्ञानेश्वरी’ची निर्मिती होऊन सातशे एकतीस वर्षे झाली. इतकी वर्षे होऊनही ‘ज्ञानेश्वरी’चा समाजावरील प्रभाव कमी झालेला नाही किंबहुना तो वाढत आहे. ‘ज्ञानेश्वरी’ हा श्रद्धाळू भाविकांच्या श्रद्धेचा, अभ्यासकांच्या अभ्यासाचा आणि टीकाकारांच्या टीकेचा विषय आहे. ‘ज्ञानेश्वरी’ इतके अनुसरण, गौरव आणि अभ्यास दुसऱ्या कोणत्याही मराठी ग्रंथाचे झाले नाही. शतकानुशतके माणसांच्या श्रद्धेचा, कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय असणारा हा ग्रंथ आपल्यापर्यंत पोहोचला, तो केवळ भाविक, अभ्यासक यांच्या अखंड ज्ञानपरंपरेमुळे !

अशा या प्रदीर्घ ज्ञानपरंपरेत ज्ञानदेवांपूर्वी काय दिसते ? हे पाहाणे आवश्यक आहे. कारण, अनेकदा ‘ज्ञानेश्वरी’तील एखाद्या ओवीचा दाखला देऊन आपण किती प्रगत होतो. अशी उल्लेखले जाते. अशा उल्लेखांनी प्रभावीत होणे शक्य आहे. पण, ‘ज्ञानेश्वरी’ची थोरवी काही अशा उल्लेखांमध्ये नाही. हेही लक्षात घेणे आवश्यक आहे. म्हणून ज्ञानदेवांपूर्वी ज्ञान परंपरा, किमान त्यांचा क्रम लक्षात घ्यावा लागतो.

भारतीय विचारविश्वाची वैदिक, लोकायत, जैन, बौद्ध या क्रमाने; तर विज्ञानाची कणाद, आर्यभट्ट, भास्कराचार्य अशी परंपरा दिसते. वेदांतांची उपनिषदे, बादरायण प्रणित ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता यांना प्रस्थानत्रयी मानले जाते. प्रस्थान म्हणजे आधारभूत ग्रंथ होय. भगवद्गीतेवर आद्य शंकराचार्यांच्या पूर्वीची भाष्ये आज उपलब्ध नाहीत. ही भाष्ये आद्य शंकराचार्य (इ.स. ७८८ इ.स. ८२०), पैशाच भाष्य, रामानुजाचार्य (इ.स. १०१७ – इ.स. ११३७), श्रीमध्वाचार्य (इ.स. ११९९- इ.स. १२७८) अशी आहेत. अशा ‘भाष्यकारांते वाट पुसत’ ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’ची निर्मिती केली आहे. ‘ज्ञानेश्वरी’ ही गीतेवरील पहिली ओवीबद्ध मराठी टीका आहे. ज्ञानदेवांपूर्वी नाथ, बसवेश्वर, श्रीचक्रधर आदींचेही विचार आहेत. ज्ञानदेवांच्या काळात देवगिरीच्या यादवांची सत्ता होती. त्यापूर्वी या महऱ्हाटी प्रदेशावर सातवाहन, अभीर, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार यांची सत्ता होती. यातील पैठणच्या सातवाहनांचा आंतरराष्ट्रीय व्यापार होता.

कालप्रवाहाच्या अशा एका विशिष्ट स्थानी ज्ञानदेव आहेत. ‘ज्ञानेश्वरी’ पूर्वी काही महानुभावीय ग्रंथांचा अपवाद सोडला तर फारसे मराठी साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे मराठी साहित्य परंपरेतील पहिल्या काही ग्रंथांमध्ये ‘ज्ञानेश्वरी’चा समावेश होतो. ज्ञानदेवांनी इ. स. १२९० मध्ये नेवासे येथे ‘ज्ञानेश्वरी’ आणि त्यानंतर ‘अमृतानुभव’ची निर्मिती केली. ‘ज्ञानेश्वरी’ची ‘भावार्थदीपिका’, ‘ज्ञानदेवी’ ही पर्यायी नावे आहेत. ‘ज्ञानेश्वरी’ मध्ये ज्ञानदेव असा उल्लेख येतो; तर नामदेव हे ज्ञानेश्वर असा उल्लेख करतात. नामदेव हे ज्ञानदेवांचे पहिले चरित्रकार आहेत. त्यांनी आदि, समाधी आणि तीर्थावळीतून श्री ज्ञानदेव चरित्र लिहिले आहे. यातील आदि प्रकरणातील एका अभंगांमध्ये पैठण ते नेवासा हा प्रवास आणि ‘ज्ञानेश्वरी’, ‘अमृतानुभव’च्या निर्मितीचा उल्लेख येतो. ज्ञानदेव आणि भावंडे शुद्धिपत्र घेतल्यानंतर नेवाश्याला येतात. मागाहून ‘म्हैसा’ येतो. त्यानंतर प्राकृतमधून ‘गीतादेवी’ आणि ‘अमृतानुभव’ची निर्मिती होते. त्यानंतर म्हाळासेचे दर्शन घेऊन सगळे नेवाश्याहून पुढे निघतात. पुढे आळे गावाला ‘म्हैसा’ शांत होतो. त्यानंतर सर्वजण अलंकापुरीला म्हणजे आळंदीला जातात. या भावंडांचा हा बहुतांश प्रवास नदीमार्गे म्हणजे गोदावरी, प्रवरा, मुळामार्गे झाला असण्याला अधिक वाव आहे.

‘ज्ञानेश्वरी’ हे एक नागर काव्य आहे. ते सातशे एकतीस वर्षांपूर्वी नेवासा नगरीतील लोकांसमोर आकाराला आले. सामान्यतः ग्रंथ हे एकांतात लिहिले जातात; ‘ज्ञानेश्वरी’ लोकांतात लिहिली गेली. त्यातही ज्ञानदेवांसारखे प्रज्ञावंत हे श्रोत्यांना भगवद्गीतेचा अर्थ लोकांच्या ‘दिठीचा विषो’ होण्यासाठी मराठीतून, लोकभाषेत समजावून सांगतात. त्यावेळी ते ‘अतिहळुवारपणा चित्ता’ आणून ‘हे शब्देविण संवादिजे। इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआदि झोंबिजे। प्रमेयासी ॥’ (१.५८) असे गीताभाष्य ऐकण्याचे गमक सांगतात. ग्रंथाच्या अखेरीस ‘किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी गेलें। एथ माझें जी उरलें। पाईकपण ||’ (१८ : १७९२) असे नम्रतापूर्वक सांगतात. ज्ञानदेव हे ‘ज्ञानेश्वरी’त अनेकवेळा श्रोत्यांचा गौरव करतात; ते कधीही स्वतःतील ऋजुता सोडत नाही. ‘ज्ञानेश्वरी’च्या अनेक वैशिष्ट्यांपैकी हे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

ज्ञानेश्वरी’ हा नीतिशास्त्राचा धडा असणारा एक अक्षरग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे एक काव्यमय प्रवचन आहे, एक श्रोतृसंवाद आहे. या ग्रंथातून ज्ञानदेवांनी मराठी भाषेतील ‘देशीकार लेणे’ घडविले, शांतरसाला श्रेष्ठ ठरविले आहे. विश्व हे परमेश्वराचे सत्य स्वरूप आहे, हे प्रतिपादिले. गुरुदेव रा. द. रानडे यांच्या मते, या ग्रंथात तत्त्वज्ञान व साक्षात्कार ह्यांचे अतिशय सुंदर व प्रभावी वर्णन आहे. तसेच त्यामध्ये सृष्टि निरीक्षणाचे सखोल व सूक्ष्म वर्णनही येते.

000

-प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे,

जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय,

ज्ञानेश्वरनगर, पो. भेंडे ता. नेवासा.

जि. अहिल्यानगर – ९४०४९८०३२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button