अहमदाबाद दि.४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानसह दहशतवादयांना सक्त ताकीद दिली आहे. ते गुजरातच्या अहमदाबादमध्ये जाहीर सभेत बोलत होते. ‘भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतरही वठणीवर न येणाऱ्या पाकिस्तानला, घरात घुसून मारु’ असा थेट इशारा मोदींनी यावेळी दिला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाच वातावरण आहे. त्यात पाकिस्तानकडून वारंवार नियमांच उल्लंघन करत कुरापती केल्या जात आहेत. त्यावर ‘आम्ही खूप सहन केलं पण आता शत्रूला घरात घुसून मारू’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
मला सत्तेची पर्वा नाही,तर देशाची चिंता आहे. पण विरोधकांनी लष्कराच्या शौर्यावर आणि बलिदानावर प्रश्नचिन्हं उपस्थित करू नये. शिव्या द्यायच्या असतील तर मला द्या, पण लष्कराला देऊ नका’ असंही ते यावेळी म्हणाले.
https://twitter.com/ANI/status/1102586829637931008
‘गेल्या ४० वर्षांपासून भारत दहशतवादाला सहन करत आहे. पण मतांच्या पेटीत अडकलेल्या राजकारण्यांनी त्यावर कोणतीही पाऊलं उचललं नाही’ असं म्हणत आगामी लोकसभेच्या मैदानात कसून उतरलेल्या काँग्रेसवर मोदींनी निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले की, ‘मला सत्तेची काळजी नाही ,मला माझ्या देशाची काळजी आहे. देशातल्या नागरिकांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे मी आता दहशतवाद सहन करू शकत नाही. घरात घुसून बदला घेण्याच्या तयारीत मी आहे. दहशतवादी पाताळात जरी लपले तरी त्यांना सोडणार नाही’ असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला दिला.