आठवडा विशेष टीम―
अमरावती, दि. १ : अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान होऊन शेतकरी बांधव अडचणीत सापडला आहे. त्यांना अधिकाधिक मदत मिळावी यासाठी सविस्तर पाहणी करून परिपूर्ण पंचनामे करावे व शेतकरी बांधवाना न्याय मिळवून द्यावा, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज दिले.
अतिवृष्टीने आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावात शेतीचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज मोर्शी तालुक्यातील राजूरवाडी, निंभारणी, लेहगाव येथे भेट देऊन शेतीची पाहणी केली, तसेच गावकरी बांधवांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, मोर्शीचे तहसीलदार सिध्दार्थ मोरे, तालुका कृषी अधिकारी कल्पना राठोड, अभिजित मानकर, रमेश काळे, श्याम सोमवंशी आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, अतिवृष्टीने नदीकाठच्या गावांतील शेतीत पुराचे पाणी घुसून नुकसान झाले. नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवाना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी शासन खंबीरपणे शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे आहे. प्रशासनाने काटेकोरपणे पाहणी करून सर्व नुकसानाच्या सविस्तर नोंदी घेऊन परिपूर्ण पंचनामे करावेत, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी दिले.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक अडचणी आल्या. कोरोनावर मात करण्यासाठी विविध प्रयत्न होत आहेत. मात्र, नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून दक्षता घ्यावी.
नागरिकांनी मास्कचा वापर, स्वच्छता व सोशल डिस्टन्स या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.यावेळी पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी निंभारणी येथील अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली व विविध कामकाजाची माहिती घेतली.