प्रशासकीयब्रेकिंग न्युज

भोसला सैनिके शाळेमुळे सैन्यदलाला उत्कृष्ट अधिकारी,देशासाठी शिस्तप्रिय नागरिक घडविण्याचे कार्य- देवेंद्र फडणवीस

आठवडा विशेष टीम―

संस्थापक डॉ. बाळाकृष्ण मुंजे यांच्या पुतळ्याचे अनावरण

जनरल बिपीन रावत सभागृहाचे लोकार्पण

नागपूर, दि. ३१ : भोसला सैनिकी शाळेच्या माध्यमातून देशाच्या सैन्यदलासाठी उत्कृष्ट अधिकारी तसेच आधुनिकतेला स्विकारणारे व शिस्तप्रिय नागरिक घडविण्याचे काम होत असल्याचे गौरोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

भोसला सैनिकी शाळेच्या परिसरात संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे व जनरल बिपीन रावत यांच्या स्मृति प्रीत्यर्थ बांधण्यात आलेल्या अत्याधुनिक सभागृहाचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.

कार्यक्रमास सेवानिवृत्त जनरल मनोज पांडे, हवाई दलाचे सेवानिवृत्त एयर चिफ मार्शल शिरीष देव उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर सेंट्रल हिंदू मिलिट्री एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुर्यरतन डागा, भोसला सैनिकी शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर, संस्थेचे कुमार काळे, दिलीप चव्हाण, राहूल दिक्षीत, हेमंत देशपांडे, विवेक रानडे, संजय जोशी, अमरेंद्र हरदास आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,
समाजामध्ये सैनिकी मुल्यांचे रोपण व सैन्याचे भारतीयीकरण तसेच त्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने भोसला सैनिकी शाळेची स्थापना झाली. आधुनिकतेला स्वीकारणारी पिढी निर्माण करण्याचे काम संस्‍थेच्या माध्यमातून होत आहे. अनुशासित भारत घडविण्याच्या कार्यासोबतच सैन्यदलाला आधुनिकतेकडे घेवून जाणारे सैन्यदल प्रमुख मेजर जनरल बिपीन रावत यांच्या स्मृती कायम राहाव्यात व त्यांच्या कार्याची युवकांना प्रेरणा मिळावी. संपूर्ण भारतीयांना मेजर बिपीन रावत यांच्या कार्याची व आदर्शांची कायम आठवण रहावी, विद्यार्थ्यांमध्ये जिद्द निर्माण व्हावी यासाठी अत्याधुनिक सभागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टीने देशाची वाटचाल सुरू असून जगातील सर्वात आधुनिक शस्त्र देशात तयार होत आहेत व आपण या शस्त्रांची निर्यातही करत आहोत. भारताने नेहमी शांतीसाठी कार्य केले असल्यामुळे बलशाली भारतच जगाला शांतीचा संदेश देवू शकतो असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

एयर मार्शल शिरीष देव यांनी भोसला सैनिकी शाळा ही एनडीए च्या धर्तीवर विकसित होत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात सैनिकी शाळांच्या शिक्षणाचा दर्जा तसेच सैनिकी शिक्षणाबाबत प्रशासनाकडून विशेष लक्ष पुरविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी सैन्य दल प्रमुख मनोज पांडे म्हणाले, जनरल बिपीन रावत हे देशासाठी अलौकीक कार्य करणारे व विकसित
भारतामध्ये सशस्त्र दलाला आधुनिकतेकडे नेणारे दूरदर्शी नेतृत्व होते. तिन्ही दलाला एकत्र करून त्यांच्यामध्ये समन्वय ठेवण्यासोबतच युद्धासाठी कायम सज्जता असावी अशा विचारांचे असल्यामुळे भारतीय सैन्य दलात त्यांच्यामुळे मोठ्या प्रमाणात बदल झाले असल्याचे गौरोद्गार यावेळी त्यांनी काढले.

भोसला सैनिकी शाळेचे अध्यक्ष शैलेश जोगळेकर यांनी स्वागत करून संस्थेमध्ये जनरल बिपीन रावत यांच्या स्मृती कायम राहाव्यात व त्यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी यासाठी अत्याधुनिक अशा सभागृहाची निर्मिती करण्यात आली असल्याचे सांगितले. सैनिकी शिक्षणाची सुरूवात करणारे संस्थेचे संस्थापक डॉ. बाळाकृष्ण मुंजे यांच्या पुतळ्याचे अनावरण ही संस्थेसाठी महत्वपूर्ण घटना असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रख्यात शिल्पकार प्रदिप शिंदे यांचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन हर्षला राजगिरे यांनी केले. तर राहूल दीक्षीत यांनी आभार मानले.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व योजनेतून तयार करण्यात आलेल्या विकासकामांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
——– 000 ——–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button