लेख

मनोवृत्ती कधी बदलणार..?

“जागतिक महिला दिनानिमित्त”

“जागतिक महिला दिन” म्हटलं की आनंद तर वाटतोच, कारण महिलांबद्दल काहीतर व कसलंतर चिंंतन-मनन करणारा हा दिवस. पुरुषप्रधान संस्कृतीत बायका आपली वेगळी दाळ सततच घरटत बसतात, कधी “महिला मंडळ” तर कधी “भगिनी मंडळ” सारख्या बॅनरखाली. अशा गोष्ठींची आठवण करून देणारा हा दिवस दर वर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. १९१४ पासून शंभर वर्षाचा काळ लोटला आणि १९७५ मध्ये याला अधिकृत मानल्यापासून चार दशके दोन वर्षापूर्वीच ओलांडली गेली, परंतु खरच एवढ्या वर्षात स्त्री स्वतंत्र झाली असे वाटते का हो आपल्याला? हा एक दिवस साजरा करून काय उपयोग आहे? खऱ्या अर्थाने तिला स्वातंत्र्य का नाही? स्त्री-स्वातंत्र्य हे आजही वरवरचे आहे असे मला वाटते. एखादी स्त्री पुरुषी कपडे घालून गाड्या चालवते म्हणजे ती स्वतंत्र आहे का? काही महिलांची जीवनशैली बदलली असली तरी सामाजिक स्तरावर समानतेच्या साच्यात ती बसलीच कुठे? ती कुठल्याही क्षेत्रातील असो तिला पुर्ण स्वातंत्र्य असते का?एखाद-दुसरी असू शकते, अपवाद असेलही परंतु कुठलाच निर्णय तिला स्वबळावर घेता येत नाही ही . घरातील छोटेमोठे निर्णय ती घेत असली तरी मोठ्या निर्णयासाठी तिला परवानगीची गरज असते मात्र पुरूष एकटा निर्णय घेऊन मोकळा होतो. अनेक सुसंस्कृत घरांत आजही तिचा शारीरिक व मानसिक छळ होताना बघायला मिळतो. तिला कोणत्याही गोष्टीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे का? बाळाला जन्म देण्यासाठी सुद्धा ती स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाही हो..नाहीतर एका स्त्रीने ठरवले की गर्भपात करणार नाही तर, आज “बेटी बचाव”च्या घोषणा कराव्याच लागणार नाही. अॅसिड हल्ला, बलात्कार अशा अनेक भीषण संकटांना महिलाच का बळी पडतात. एखाद्या स्त्रीला नवऱ्याने काही कारणाने सोडचिठ्ठी दिली तर तिला कुठे असतो थारा? ना सासरी ना माहेरी ! स्वतःच्या पायावर उभी असेल तर ठीक, नाहीतर कसाबाच्या बकऱ्याप्रमाणेच असते तिची अवस्था! कामांध पामरांरूपी तलवारी टांगलेल्याच असतात निराश्रित महिलेवर. माहेरची मंडळी तरी ठेवून घेतात का? सासर आणि माहेरच्या संपत्तीत समान हक्क आहे म्हणे, पण व्यवहारात दिसतो कुठे? फक्त कागदोपत्रीच आहे, अमलात तर नाहीच.
जर ती सुशिक्षित, नोकरदार असेल तर ठीक नाहीतर आश्रम किंवा आत्महत्या करण्याशिवाय तिला पर्याय नसतो.
स्त्रियांना प्रत्येक ठिकाणी चांगली वागणूक मिळेलच असे नाही, साधे फेसबुकवरच घ्या, तिथेही अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. काहीजण असतात श्वेत वस्त्रात लपलेली धेंडं. खडा टाकून बघतात व इनबाॅक्स मध्ये येऊन कमेंट्स व मॅसेज सुरु. तेही सुरक्षित करावे लागते तरी सुद्धा त्रास देणारे देतातच. अशी अनेक उदाहरणे देता येतील खेडोपाडी किंवा शहरात. जवळ-जवळ सर्वत्र महिलांचे अनेक प्रश्न आजही यथावत् आहे. ते केव्हा सुटतील याची निश्चित शाश्वती नाही. महिलांनी सर्वच क्षेत्रात खूप झपाट्याने प्रगती केली आहे, परंतु शंभर टक्के पुरुषां प्रमाणे ती तेव्हाच स्वतंत्र होईल, जेव्हा पुरुषप्रधान विचारधारा बदलेल.
आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आदि नाना क्षेत्रांत महिलांनी प्रगती केली परंतु तिलाही काही समस्या भेडसावतच असतात. इतकं सोप नसतं सर्व एका स्त्रीला. हे तेव्हाच शक्य होऊ शकते जेव्हा एका स्त्रीच्या मनात आत्मविश्वास आणि जिद्दअसेल. ती कोणताही निर्णय ठामपणे घेऊ शकेल. छोट्या छोट्या गोष्ठींपासून जर स्त्री वंचित असेल तर काय उपयोग तिच्या अधिकाराच्या नावाने एक दिवस साजरा करून? असे असेल तर “मुलगी वाचवा, मुलगी शिकवा” हे आजही ओरडून सांगायची गरजच काय? तिला कायद्याने, मनाने, विचाराने प्रत्येक बाबीने स्वातंत्र्य द्यावे तेव्हाच हा जागतिक महिला दिन साजरा करणे सार्थक ठरेल.
पिढ्यानपिढ्या गुलामगिरीच्या अंधकारात खितपत पडून २१व्या शतकातही मुक्तीच्या “किरणेची” वाट बघत समानता, स्वातंत्र्य व हक्काचे मार्ग चाचपडणाऱ्या भगिनींना एवढाच संदेश द्यावा वाटतो-

” घे जगून तू…
क्षण चार आनंदाचे…
दे सोडून चिंता…
क्षणभर व्याप संसाराचे..!

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

लेखक – इंजि.कु.हुले दत्ता बळीराम
(पाटोदा) जि.बीड
मो.9960135634

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button