बीड जिल्हाराजकारण

निवडणूक काळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सोपविलेली कामे जबाबदारी गंभीरतेने पार पाडावी -जिल्हाधिकारी डॉ. आस्तिककुमार पांडे

बीड, दि.6 : जिल्हयात होणारी लोकसभा निवडणूक नि:पक्ष, भयमुक्त आणि शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त अधिकाऱ्यांनी जबाबदारीने व समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. आस्तिककुमार पांडे यांनी दिले.
39- बीड लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019 निवडणूक विषयक कामाची आढावा बैठकीचे आयोजन बीड येथील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात करण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे, निवासी उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण धरमकर, उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी श्री पांडे म्हणाले की, निवडणूक प्रक्रियेमध्ये क्षेत्रिय अधिकाऱ्यांचे काम महत्वाचे असल्याने त्यांना निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांची व कायद्यांची माहिती असणे आवश्यक आहे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील निवडणुकीचा क्षेत्रिय आराखडा तयार करुन त्यांना लागणारी वाहने, बुथची संख्या, त्यामध्ये असणारी सुविधा व लागणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती तयार करणे गरजेचे आहे. त्यांच्या क्षेत्रामध्ये निवडणूक कालावधीत चुक झाल्यास पहिली कारवाई क्षेत्रिय अधिकाऱ्यांवर होणार असल्याने त्यांनी आपले काम निर्भयपणे बजावणे गरजेचे आहे. तसेच क्षेत्रिय अधिकाऱ्यांच्या अंतर्गत साधारणत: 10 ते 12 मतदान केंद्र राहणार असल्याने सर्व मतदान केंद्राची पहाणी करुन त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेसाठी व मतदानासाठी सर्व व्यवस्था असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्याकसाठी योग्य त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
निवडणूक आयोगाने निवडणूक काळात सामान्य नागरिकांना तक्रारी करण्यासाठी C-VIGIL हे ॲप्स विकसित करून दिले आहे. या ॲप्सवर आचार संहीता भंग, पैसे वाटप, दारू विक्री, मतदानासाठी प्रलोभने दाखविणे या प्रकारच्या तक्रारींचे फोटो, व्हिडीओ अपलोड करता येतील. केलेल्या तक्रारीचे विहित कालावधीत निराकरण करणे सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी राहणार आहे. या कामामध्ये निष्काळजी करता येणार नाही याची संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी. आयोगाने निवडणूक प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत असून निवडणूक प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी ॲप्स विकसित करण्यात आले आहे. निवडणूकीमध्ये नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना सोपविलेली कामे जबाबदारीने पार पाडावी या कामामध्ये हयगय केल्यास त्यांच्या विरुध्द कारवाई होणार आहे. तसेच 39- बीड लोकसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणूक 2019 यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे. निवडणूक प्रक्रियामध्ये बाधा आणणाऱ्या समाज कंटकासह गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करावी. जिल्ह्यात गैरमार्गाने मद्य विक्री करण्याऱ्यांचा शोध घ्यावा. जिल्ह्यातील संवेदनशील,अतिसंवदेनशील मतदान केंद्राची गावनिहाय माहिती घ्यावी व तशी यादी तयार करुन त्या ठिकाणी योग्य त्या उपाय योजना कराव्यात अवैद्य शस्त्रे बाळगण्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी व ज्यांना शस्त्र परवाना देण्यात आले आहेत त्यांच्या कडील शस्त्र तात्काळ जमा करुन घ्यावे निवडणूक प्रक्रियामध्ये बाधा आणणाऱ्या समाज कंटकासह गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करावी. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलतांना पोलीस अधीक्षक जी श्रीधर म्हणाले की, निवडणुकीच्या कामामध्ये सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी सहभागी राहणार असून निवडणूक यशस्वीपणे पारपाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याची गरज आहे. लोकसभा निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन केले असून निवडणूक प्रक्रियामध्ये बाधा आणणाऱ्या समाज कंटकासह गुन्हेगारांची माहिती घेऊन त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यासाठी आवश्यकती कार्यवाही करण्यात यआली आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, आयोगाने निवडणूक प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत असून निवडणूक प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी यासाठी ॲप्स विकसित केले आहे याची माहिती सर्वांनी करुन घ्यावी व आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना याची माहिती करुन दयावी असे सांगून या निवडणुक प्रक्रीयमध्ये कोणतीही चुक होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, प्रणीण चोपडे, पोलीस अधिकारी श्री मानकर यांनी विविध विषयावर माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक उप जिल्हा निवडणुकअधिकारी प्रवीण धरमकर यांनी केले. तर आभार उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यानी मानले. याकार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी उपस्थित होते.

    WhatsApp वर बातम्या हव्यात ?


    बातमी बद्दल तुमच्या प्रतिक्रिया लिहा

    This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.