बीड:नानासाहेब डिडुळ,उपसंपादक―
कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे मागील पाच महिन्यापेक्षा जास्त काळापासून संपूर्ण देश लॉकडाऊन झालेला आहे. सप्टेंबर महिन्यापासून बऱ्यापैकी मुभा भारतीय जनतेला सरकारकडून देण्यात आली आहे. शासकीय, खाजगी स्तरावरील अनेक सेवा,उद्योग व्यवसाय जसे की, विविध कारखाने, उद्योगबाजार, बससेवा, रेल्वे सेवा, दुकाने, हॉटेल्स, देशी दारूदुकाने, बियरबार तसेच निर्बंधासह काही सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास मुभा देवून गर्दीची ठिकाणे खुले करण्यास सुरुवात झालेली आहे. मात्र शाळा व महाविद्यालय बंदच आहेत. यामुळे देशाचे उदयाचे भविष्य असलेली आपल्या भावी पिढीचे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळा व महाविद्यालय सुरू करावीत अशी मागणी मानवी हक्क अभियान या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी केंद्र सरकार व राज्यसरकारकडे केली आहे.
देश जागतिक महासत्ता, आर्थिक महासत्ता होण्याच्या मार्गावर असतांना देशाचे उदयाचे भविष्य घरामध्ये डांबून ठेवणे योग्य नाही. जरी हे निर्बंध आरोग्याच्या दृष्टीने योग्य वाटत असले तरी आजच्या चालू अनलॉक प्रक्रियेतून कोरोनाच्या होणाऱ्या प्रार्दुभावामुळे सर्व जनता विध्यार्थ्यांसहित मुक्तपणे संचार करत आहेत. यात सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर, काही आरोग्यविषयक निर्बंध लावून शाळा, विद्यालय, कॉलेज, महाविद्यालये सुरू करावेत. विद्यार्थ्यांचे पर्यायाने राज्याचे, देशाचे शैक्षणिक, आर्थिक नुकसान न करता काही आरोग्य विषयक बाबींची पूर्तता करून शाळा, कॉलेज, विद्यालय, महाविद्यालय सुरू करण्यासाठी आपण परवानगी दयावी असेही पत्रकार सुरेश पाटोळे यांनी सांगितले आहे.