गेवराई (प्रतिनिधी): शेतकऱ्यांसाठी आणि सर्व सामान्य जनतेसाठी दुष्काळाचा काळ कठीण असतो. पण हाच दुष्काळ काहीजणांना सुगीचा ठरतो. टँकरलॉबी ही अशीच एक जमात. अनेक टँकरमालक किती पाणी भरले, कुठे दिले, किती खेपा केल्या यांचा कशाचाच ताळमेळ लागू देत नाहीत. परंतु, बीड जिल्ह्यात मात्र अशा टँकरलॉबीला आता बुरे दिन आल्याचे दिसून येत आहे. नुकतेच नियुक्त झालेले जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांच्या धडक तपासणी सत्रामुळे दुष्काळात दुकानदारी करणाऱ्याना चांगलीच जरब बसली आहे. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी शुक्रवारी अचानक गेवराई तील पाणी पुरवठा करणाऱ्या २० पाण्याच्या टँकरची तपासणी केली. थेट टँकरवर चढून जिल्हाधिकाऱ्यांनी तपासणीचे काम हाती घेतल्याने आता टँकर लॉबीला भ्रष्टाचार करता येणार नाही हे निश्चित झाले आहे.
बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडे यांनी आज अचानक गेवराई तालुक्यात थेट मोहीम चालू केली, पाणी पुरवठा करणाऱ्या तब्बल २० टँकरची तपासणी केली, कोणते टँकर कोठून पाणी भरतात, कोठे जातात, रोज किती खेपा होतात, त्याची नोंद वही आहे का?, जिपीआरएस सुविधा आहे का? याची खातरजमा करून ताकीद दिली. या पुढे नियमानुसार ज्या अटी शर्थी दिल्या आहेत त्या पाळल्या गेल्या पाहिजेत असा सज्जड दमही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यांच्या या क्रॉस चेकिंगमुळे टँकर लॉबीचे धाबे दणाणले आहेत. मात्र, ऐन दुष्काळात पांडे यांच्यासारखे जिल्हाधिकारी लाभल्यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा वाटत आहे.