मुंबई : लोकसभेच्या निवडणुक 2019 साठी भाजपनेही प्रचाराची जय्यत तयारी केली आहे. महाराष्ट्रात पंचवीस मोठ्या सभा घेतल्या जाणार आहेत, यात उ.प.चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजनाथ सिंह, नितीन गडकरी हे राष्ट्रीय स्तरावरील नेते उपस्थित राहणार आहेत. तर काही सभांना स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युतीची जाहीर सभाही होणार आहे. या सभेला भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे हे मोठ्या कालावधीनंतर एका व्यासपीठावर आपल्याला दिसतील. या सभेचं ठिकाण आणि तारीख अद्याप निश्चीत झालेलं नसले तरी शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये या संयुक्त सभेसाठी भरपूर उत्सुकता आहे.
महाराष्ट्रात प्रचारासाठी भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा अध्यक्ष अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह दिग्गज नेते मंडळी येणार असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे.
राज्यातील 48 मतदारसंघांमध्येही प्रचार होऊ शकेल,अशा पद्धतीने भाजपकडून पंचवीस सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.
नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले
काँग्रेसने नाना पटोले यांना नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध नाना पटोले अशी लढत रंगणार आहे.