परळी (प्रतिनिधी) : जनमत बनविण्याचे साधन प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम बहुजनांकडे नसल्याने बहुजन समाज मोठया प्रमाणात संभ्रमात पडल्याचे प्रतिपादन इंजि. भगवान साकसमुद्रे यांनी प्रसार माध्यमांची भूमिका व योगदान या विषयावर अध्यक्षीय समारोप करताना दि. 17 मार्च 2019 रोजी लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे आयोजित कार्यक्रमात केले. यावेळी विचारमंचावर ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड, संघनायक महाराष्ट्र या मासिकाचे संपादक सदाशिव कांबळे, अजय गंडले, अॅड.कपिल चिंडालीया, इंजि. जयपाल कांबळे, सतिश कारेपुरकर, विकास वाघमारे, आकाश देवरे, बापू गायकवाड, लातूरचे सचिन भालेराव, बीडचे ब्रम्हानंद कांबळे, उमरग्याचे सोनकांबळे, परळीचे शहर प्रतिनीधी प्रकाशसिंह तुसाम, परभणीचे कैलास नागरे आदिंची उपस्थिती होती.
साकसमुद्रे पुढे म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारिता हा पैसे कमविण्याचा धंदा नसून लोकजागृती करिता घेतलेली स्वंयदिक्षा आहे याचीही आठवण करून दिली. मोठया प्रमाणावर संघटितरित्या यश संपादन करावयाचे असल्यास नितीमत्ता व इमानदारी असणे आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले होते की, ज्या चळवळीला स्वतःचे वर्तमान पत्र नसते तिची अवस्था पंख तुटलेल्या पाखरासारखी असते. म्हणून स्वतः डॉ. बाबासाहेबांनी मुकनायक, बहिष्कृत भारत, जनता, प्रबुध्द भारत अशी वर्तमान पत्रे काढली. त्यामुळे बहुजन चळवळीला यशस्वी करण्यासाठी स्वतःचा मजबुत मिडीया आज घडीला उपलब्ध नाही. म्हणून ज्येष्ठ पत्रकार रानबा गायकवाड यांचे लवकरच राज्यव्यापी पत्रकार प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येणार आहे. संघनायक महाराष्ट्र या मासिकाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन प्रा. ब्रम्हानंद कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. दशरथ रोडे यांनी मानले.