प्रशासकीयब्रेकिंग न्युज

जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत बाधित क्षेत्रासह आरोग्य व शाश्वत विकासाला प्राधान्य – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

आठवडा विशेष टीम―

️नियामक परिषद बैठक संपन्न

नागपूर, दि. १० : जिल्ह्यातील प्रत्यक्ष खाण बाधीत क्षेत्र व अप्रत्यक्ष खाण बाधित क्षेत्रात शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार येत्या आर्थिक वर्षात लोकोपयोगी व शाश्वत विकासाच्या अनुषंगाने कामाचा प्राधान्यक्रम निश्चित करणे आवश्यक आहे. हा प्राधान्यक्रम ठरविण्याअगोदर जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक समितीमधील सर्व सन्माननिय सदस्यांनी सुचविलेल्या कामांचा विचार करुन कालबध्द कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक समितीची बैठक नियोजन भवन येथे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीस  वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, विधान परिषद सदस्य सर्वश्री डॉ. परिणय फुके, कृपाल तुमाने, संदिप जोशी, आमदार सर्वश्री डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे, प्रविण दटके, चरणसिंग ठाकूर, संजय मेश्राम, समितीचे पदसिध्द अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, समितीचे पदसिध्द सचिव जिल्हा खनिकर्म अधिकारी अतुल दोड, मनपा अतिरिक्त आयुक्त बी. वैश्णवी आदी उपस्थित होते.

रस्ते विकासासाठी शासनाकडे विशेष प्रस्ताव पाठवू

जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत शासनाने विविध विकास कामाच्या उच्च प्राथमिक बाबी निश्चित करुन दिल्या आहेत. यात आरोग्यसेवा कार्यक्षम करणे, बाधीत क्षेत्रात फिरत्या आरोग्य सुविधा,  शिक्षण,क्रीडा पायाभूत सुविधा, ई-लर्निग सेटअप, महिला व बालकल्याण यात कुपोषण, वयोवृध्द आणि दिव्यांग कल्याण, कौशल्यविकास आणि उपजिवीका निर्मिती, स्वच्छता,गृहनिर्माण आदी बाबींवर भर देण्यात आला आहे. अप्रत्यक्ष बाधीत क्षेत्रासाठी जलसिंचन,पाणलोट क्षेत्र विकास,  सुक्ष्मसिंचन, नालाबांध आदी कामे अपेक्षीत आहेत. यातील प्राधान्यक्रम निवडून कोणत्याही स्थितीत रस्ते विकासाची कामे न घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. खाण बाधीत क्षेत्रातील रस्ते विकासासाठी  मुख्यमंत्र्यांना वेगळा निधी मागण्यात येईल, असे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

भविष्यातील गरजा ओळखून खाण बाधीत क्षेत्राचा परिपूर्ण विकास आराखडा तयार करावा – वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल

जिल्ह्यातील  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खाण बाधीत क्षेत्रातील विविध विकास कामातून साध्य होणाऱ्या  बदलाचे संकल्पचित्र आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे.  यासाठी प्रस्तावित विकास कामे त्याची पूर्तता याबाबत सविस्तर गावपातळीवरील आराखडा तयार करण्याचे निर्देश वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button