प्रशासकीयब्रेकिंग न्युज

एमएचटी-सीईटी २०२५ पीसीएम गटाच्या परीक्षेत तांत्रिक त्रुटी; ५ मे रोजी फेर परीक्षा 

आठवडा विशेष टीम―




मुंबई, दि. ३० : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दि.२७ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२५ (पीसीएम गट) सामाईक प्रवेश परीक्षेच्या सकाळच्या सत्रामध्ये इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे अनेक विद्यार्थ्यांनी तक्रारी केल्या. या तक्रारीची तातडीने दखल घेऊन या विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे निर्देश उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले होते.

त्यामुळे या सत्रातील सर्व उमेदवारांसाठी फेर परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. ही फेर परीक्षा दि. ५ मे २०२५ रोजी होणार आहे, अशी माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने दिली आहे.

यावर्षी एमएचटी-सीईटी पीसीएम गटाची परीक्षा १९ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान १५ सत्रांमध्ये १९७ परीक्षा केंद्रांवर पार पडली. एकूण ४,६४,२६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ४,२५,५४८ उमेदवारांनी परीक्षा दिली. २७ एप्रिलच्या सकाळी घेतलेल्या सत्रात इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमांतून एकूण 27837 उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर काही उमेदवार आणि पालकांनी इंग्रजी माध्यमातील गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तांत्रिक त्रुटी असल्याबाबत तक्रारी केल्या. त्या अनुषंगाने राज्य सीईटी कक्षाने  तज्ञांमार्फत प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली असता, २१ प्रश्नांमध्ये तांत्रिक त्रुटी असल्याचे आढळले. उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून 27837 उमेदवारांची फेर परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित उमेदवारांनी अधिकृत www.mahacet.org या वेबसाइटवर भेट देऊन अद्ययावत माहितीची नोंद घ्यावी, असे आवाहन सीईटी कक्षाकडून करण्यात आले आहे.

०००

काशीबाई थोरात/विसंअ/







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button