आठवडा विशेष टीम―
राज्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विविध बैठका
अमरावती दि 23 (विमाका): मेळघाटात धारणी व चिखलदरा तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना शिक्षणानुरूप प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे. हा प्रशिक्षण कार्यक्रम सातत्यपूर्ण करण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यादृष्टीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विविध विभागाचा आढावा श्री. कडू यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाडे, विस्तार अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
चिखलदरा तालुक्यातील ५४ ग्रामपंचायत अंतर्गत ५ टक्के पेसा निधीतून प्रस्तावित रोजगार प्रशिक्षणाबाबत आढावा श्री. कडू यांनी घेतला. मेळघाटात विविध गावांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबवावा. या प्रशिक्षणाबाबत जनजागृती व माहिती ग्रामपंचायतींच्या माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचविण्यात यावी असे निर्देश श्री. कडू यांनी दिले.
प्रशिक्षणाचे नियोजन काटेकोरपणे करावे
प्रशिक्षणाचे नियोजन जिल्हा परिषदेत येणाऱ्या संबंधित विभागाने करावे. चिखलदरा व धारणी येथील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींची नोंदणी तक्ता स्वरुपात करावी. त्यात युवकांच्या शैक्षणिक बाबींचा, कला आदींच्या माहीतीचा समावेश करावा. त्यानुसार त्यांना क्रिडा प्रशिक्षण, पोलीस प्रशिक्षण, सैन्यदलात प्रवेश प्रशिक्षण अशा पद्धतीने वर्गीकरण करुन त्यांना प्रशिक्षित करण्यात यावे, अशा सुचना श्री. कडू यांनी यावेळी दिले.
प्रशिक्षणाचा कालावधी ९० दिवसांचा असून जिल्हा परिषदेने कौशल्य विकास विभागासोबत समन्वय ठेवून नियोजन करावे. रोजगारासंबंधी सर्व बाबीं प्रशिक्षणात अंतर्भूत करण्याच्या सूचना श्री. कडू यांनी यावेळी दिल्या.
पेसा अंतर्गत ग्राम पंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम कराव्यात
पेसा कायद्याअंतर्गत अनुसुचित क्षेत्रातील ग्राम पंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरीता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे योग्य नियोजन करावे. ग्रामीण भागात पायाभुत सुविधांची निर्मिती, वन हक्क अधिनियमांची अंमलबजावणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, वनीकरण, वन्यजीव संवंर्धन आदींबाबत प्रस्ताव सादर करुन पाठपुरावा करण्याचे निर्देश श्री. कडू यांनी दिले.
दुग्धोत्पादन व दुधाची प्रतवारी सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात
शेतीला पूरक जोडव्यवसायासंबंधित दुग्धोत्पादन योजना, पशुसंवर्धन आदी बाबींचाही आढावाही जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी स्वतंत्र बैठकीद्वारे घेतला.
जोड व्यवसाय करणारे शेतकरी, दुग्ध व्यावसायिक किंवा पशुपालक यांच्याकडून मदर डेअरीला प्राप्त होणारे दूध परत पाठविले जाते. शेतकरी, व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होऊ नये म्हणुन दुध परत पाठवित असताना दुधाच्या परिक्षण पद्धतीच्या निकषांचे काटेकोर पालन व्हावे अशा सुचना श्री कडू यांनी मदर डेयरी संचालकांना दिल्या.
दुधाची प्रतवारी करत असताना दुधाला वेगवेगळे दर लागू होतात. दुधाला जास्तीत जास्त दर प्राप्त होण्यासाठी दुधाळ जनावरांच्या खाद्यान्नात आवश्यक ते बदल करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात यावे. शेतकऱ्यांकडे असलेल्या भाकड व दुधाळ जनावरांची संख्या, हिरवा व वाळलेल्या चाऱ्याची उपलब्धता, पशूंना पुरविण्यात येणारे खाद्यान्य आदी बाबत माहिती श्री कडू यांनी घेतली.
चारा लागवड, वैरण विकासाबाबत प्रस्ताव द्यावा
जनावराच्या चाऱ्याची समस्या सोडविण्यासाठी भाडे तत्वावर इ क्लास जमीन घेऊन त्या जागेचे सपाटीकरण करून तेथे चारा लागवड विकसित करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, शेतकऱ्यांचा एक गट तयार करून तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्व त्यांना योजनांबाबत वेळोवेळी माहिती देण्यात यावी, अचलपूर तालुक्यातील 2 हजार 100 शेतकरी व पशुपालकांच्या पशूंना चाऱ्याची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी चारा निर्मिती करण्याकरिता प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश श्री कडू यांनी दिले. पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
०००