पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “पीएम केअर फॉर चिल्ड्रन” योजनेंतर्गत अनाथ बालकांना विविध लाभ केले जारी

आठवडा विशेष टीम―

अलिबाग,दि.30 (आठवडा विशेष):- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दि.30 मे 2022 “पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रन” योजनेंतर्गत देशभरातील कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे लाभ जारी करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री श्रीमती स्मृती इराणी, मंत्रीपरिषदेचे इतर सदस्य आणि मुख्यमंत्री या कार्यक्रमाशी दूरदृष्यप्रणालीद्वारे जोडलेले होते.

रायगड जिल्ह्यात पंचायत राज, केंद्रीय राज्यमंत्री श्री.कपिल मोरेश्वर पाटील यांच्या हस्ते बालकांना लाभाचे वाटप जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) अमित सानप, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विनीत म्हात्रे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अशोक पाटील, राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्राचे श्री.चिंतामणी मिश्रा व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या मुलांना आयुष्यात भेडसावत असलेल्या अडचणींबद्दल पंतप्रधानांनी यावेळी सहानुभूती व्यक्त केली. “दररोज नवा संघर्ष, दररोज नवी आव्हाने, आज ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम होत आहे, त्या आपल्यासोबत असलेल्या मुलांचे दुःख शब्दात मांडणे खूप कठीण आहे,” असे पंतप्रधान म्हणाले. मी पंतप्रधान म्हणून नव्हे तर कुटुंबातील एक सदस्य म्हणून बोलत असल्याचे ते म्हणाले.

अशा परिस्थितीत, “आई आणि वडील दोघांचेही छत्र गमावलेल्या अशा कोरोनाग्रस्त मुलांच्या अडचणी कमी करण्यासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन हा एक छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक देशवासीय अत्यंत संवेदनशीलतेसह तुमच्या पाठीशी आहे, या वस्तुस्थितीचेही पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन हे एक प्रतिबिंब आहे” असे पंतप्रधान म्हणाले. जर कुणाला व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज हवे असेल तर त्यासाठी देखील “पीएम केअर्स” मदत करेल, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. इतर दैनंदिन गरजांसाठी अन्य योजनांद्वारे दरमहा 4 हजार रुपयांची व्यवस्थाही करण्यात आली आहे. वयाच्या 23 व्या वर्षी 10 लाख रुपयांव्यतिरिक्त आयुष्मान कार्डद्वारे आरोग्य सुरक्षा आणि मानसिक आणि भावनिक मदतीसाठी संवाद हेल्पलाइनद्वारे भावनिक समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महामारीच्या सर्वात वेदनादायक परिणामांना इतक्या धैर्याने तोंड दिल्याबद्दल पंतप्रधानांनी मुलांना सलाम केला आणि सांगितले की, पालकांच्या प्रेमाची भरपाई कशानेही होऊ शकत नाही. या कठीण काळात भारतमाता तुम्हा सर्व मुलांसोबत आहे. पीएम केअर फॉर चिल्ड्रनच्या माध्यमातून देश आपली जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे.

केंद्र व राज्याच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्रातून रायगडसह नागपूर, मुंबई, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, चंद्रपूर, नाशिक या जिल्ह्यात केंद्रीय मंत्र्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत बालकांना पीएम केअर्स योजनेसंदर्भातील दस्तऐवज देण्यात आले.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या 26 बालकांना लाभ आणि सेवांबाबत किटचे वाटप

कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या रायगड जिल्ह्यातल्या 26 बालकांना लाभ आणि सेवा बाबतच्या किटचे वाटप करण्यात आले.  या कार्यक्रमात महाराष्ट्रातील रायगड येथून केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील सहभागी झाले आणि रायगड परिसरात कोविड महामारीमुळे पालक गमावलेल्या 26 अनाथ मुलांना त्यांनी मुलांसाठीच्या पीएम केअर्स लाभार्थी किट्सचे वाटप केले. यामध्ये 18 वर्षावरील 06 तर 18 वर्षाखालील 20 अनाथ बालकांचा समावेश आहे.

या प्रसंगी पंचायत राज, केंद्रीय राज्यमंत्री श्री.कपिल पाटील म्हणाले की, कोविड-19 मुळे अनाथ झालेल्या बालकांना मदतीचा हात देण्याचा हा एक भावनात्मक असा कार्यक्रम होता. या काळात अनाथ झालेल्या बालकांची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. पंतप्रधान श्री.मोदी यांनी पंतप्रधान म्हणून नाही तर या बालकांचे पालक म्हणून या कार्यक्रमाच्या माध्यमातून या अनाथ बालकांशी संवाद साधला. देशाचे पंतप्रधान किती संवेदनशील आहेत, हे यावरून दिसते. या बालकांच्या भविष्याची चिंता मिटविण्यासाठी भारत सरकारबरोबरच महाराष्ट्र सरकारनेही योगदान दिले आहे. प्रधानमंत्री केअरमध्ये देशाच्या अनेक लोकांनी त्यांचा निधी दिलेला आहे, याचा अर्थ असा की, या देशातल्या 130 कोटी जनतेने खऱ्या अर्थाने या सगळ्या अनाथ बालकांचे पालकत्व स्विकारले आहे, हे विशेष कौतुकास्पद आहे.

शेवटी या अनाथ बालकांच्या आई वडिलांनी त्यांच्यासाठी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, आई-वडील नसण्याची कमतरता भासू नये यासाठी विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्ती, संस्थांनी या बालकांना भावनिक, आर्थिक, सामाजिक आधार देण्यासाठी पुढे यावे, त्यांच्या पालकांसाठी हीच खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनीही यावेळी या अनाथ बालकांशी संवाद साधला. या बालकांना धीर देवून त्यांनी या बालकांना त्यांच्या पुढील आयुष्यात ज्या क्षेत्रात स्वत:चे करिअर घडवायचे आहे, त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची खात्री दिली. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या बालकांनी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या “गरूडझेप स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन” केंद्राचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या बालकांना केले.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांची तत्परता

या कार्यक्रमासाठी उपस्थित अनाथ बालकांमधील एका बालकाने स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असल्याचे सांगितले असता जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी तत्परतेने या बालकासाठी स्पर्धा परिक्षा पुस्तकांचा संच उपलब्ध करून देण्याविषयी संबंधितांना निर्देश दिले. तसेच या बालकास जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या “गरूडझेप स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन” केंद्रांतर्गत नियमित मार्गदर्शन मिळेल, याचीही तातडीने व्यवस्था केली.

जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 26

जिल्ह्यातील कोविड-19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची माहिती केंद्रीय राज्यमंत्री श्री.कपिल पाटील यांना देताना जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री.म्हात्रे यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 26, कोविड-19 मुळे वडील गमावलेल्या बालकांची संख्या 603, कोविड-19 मुळे आई गमावलेल्या बालकांची संख्या 61, कोविड-19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 690 बालकांपैकी मुलांची संख्या 353 तसेच कोविड-19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या एकूण 690 बालकांपैकी मुलींची संख्या 311 आहे.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय टास्क फोर्स समिती स्थापन करण्यात आलेली आहे. तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समिती स्थापन करण्यात आली आहे. या समिती मार्फत कोविड-19 बाधित एकल पालक/दोन्ही पालक गमावलेली बालके, विधवा महिला यांना विविध योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून रायगड जिल्ह्यातील दोन्ही पालक गमावलेल्या कोविड-19 बाधित 26 मुलांपैकी 05 बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये SOS बालग्राम सोगाव, अलिबाग या संस्थेत दाखल करण्यात आलेले आहे. बालकांच्या शिक्षण, आरोग्य, निवास अशी सर्व व्यवस्था संस्थेमध्ये करण्यात आलेली आहे. उर्वरीत 21 बालकांना बाल कल्याण समितीच्या आदेशान्वये बालकांचे नातेवाईक सांभाळकर्ते यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत. रायगड जिल्ह्यातील कोविड-19 मुळे दोन्ही पालक/एक पालक गमावलेल्या मुलांना बालसंगोपन योजनेंतर्गत प्रत्येक बालकास प्रति महा 1 हजार 100 रुपये लाभ देण्यात येतो.

बालसंगोपन योजनेंतर्गत रायगड जिल्ह्यातील बालकल्याण समितीकडून 447 प्रकरणे मंजूर करण्यात आली असून त्यापैकी 442 बालकांना महिना 1 हजार 100 रुपयांचा लाभ देण्यात आला असून केंद्र शासन पी.एम. केअर योजनेंतर्गत कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या रायगड जिल्ह्यातील एकूण 26 अनाथ बालकांना प्रति बालक रु.10 लाख या प्रमाणे एकूण 02 कोटी 60 लाख मंजूर झालेला आहे. या योजनेंतर्गत 26 अनाथ बालकांना त्याच्या वयोगटानुसार बालक व जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त पोस्ट खात्यात अनुदान प्राप्त झालेले आहे. राज्य सरकार कडील आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत प्रति बालक 05 लाख असे एकूण 26 अनाथ बालक व एकूण प्राप्त झालेला निधी 01 कोटी 30 लाख रुपये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या संयुक्त बँक खात्यात मुदत ठेव स्वरुपात जमा करण्यात आलेला आहे, असे ते म्हणाले.

सर्वोच्च न्यायालय यांच्याकडून रायगड जिल्ह्यासाठी 70 लाख रुपये बाल न्याय निधी प्राप्त झाला. हा निधी रायगड जिल्ह्यातील कोविड-19 मुळे एक अथवा दोन्ही पालक गमावलेली एकूण 700 बालकांच्या बँक खात्यात जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मान्यतेने प्रति बालक रुपये 10 हजार जमा करण्यात आले आहेत.

कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या 26 अनाथ बालकांचे वडिलोपार्जित मिळकती मधील वारस हक्क अबाधित राहण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रायगड यांच्याकडून जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रायगड यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत व याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून कार्यवाही करण्यात येत आहे.

कोविड-19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या रायगड जिल्ह्यातील सर्व 26 अनाथ बालकांचे अनाथ प्रमाणपत्रसाठीचे प्रस्ताव सादर करण्यात आले असून पुढील कार्यवाही विभागीय स्तरावर सुरू आहे.

कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या रायगड जिल्ह्यातील 26 अनाथ बालकांसाठी जिल्हाधिकारी डॉ.कल्याणकर यांनी प्रत्येक बालकांसाठी मदतदूत म्हणून स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे.

00000

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.