लेख

तंत्रज्ञानाच्या स्मार्ट युगात गावच खरं गावपण हरवत आहे―दत्ता हुले

पाटोदा: आज आपण एकविसाव्या शतकात वावरत आहोत ,या तंत्रज्ञानाच्या युगात विज्ञानाने खूप प्रगती केली,सायकलच्या जागी मोटारसायकल आली, बैलगाडीच्या जागी आलिशान चारचाकी आली,त्या जुना फिरवून फिरवून नातेवाईकाला फोन करायच्या एस.टी.डी. फोनच्या जागी आज ४-जी,५-जी मोबाईल आला, कधीकाळी गल्लीत एका घरात पत्र्यावर जुना अँटेना व घरात काळा-पांढरा टीव्ही असायचा त्या अँटीन्याला हलवून हलवुन टीव्हीवर काळसर चित्र दिसायची,आज तंत्रज्ञानाने प्रगती केली अन पाहिजे तेवढ्या भिंतीच्या आकाराचे टीव्ही व पडदे आले,शेतकऱ्याला बैलांच्या जागी ट्रॅकर आला श्रम व वेळ कमी झाला, विहरीतील पाणी उपसण्यासाठी मोटा (कातड्याचे पाणी उपसण्याचे साधन)होत्या, सकाळच्या प्रहरी कुई-कुई करत मोटाचे पाणी शेताला जायचे ,विज्ञानाने प्रगती केली अन आज विद्युत, सोलायर पाणीपंप आले,ज्या सर्वसामान्य माणसांना कधी बँकच माहीत नव्हती ती लोक आज गुगल-प्ले,फोन -पे, च्या माध्यमातून आज पैशाची देवाणघेवाण करू लागली,धोतर पायजमा-टोपीच्या जागी जीन्स पॅन्ट टी-शर्ट आले,कोसो दूर असणाऱ्या माणसाला नातेवाईकांची वर्षे वर्ष भेट होत नसायची पण आज विज्ञानाने प्रगती केली अन मोटारसायकलपासून ते विमानापर्यंत तंत्रज्ञान विकसित झाले आणि आज लोक मनसोक्त फिरू लागले नक्कीच विज्ञानाने प्रगती केली.
जेव्हा खेड्यातील शेतकरी शेतीला उन्हाळा-खर्डा(मशागत)करायचा तेव्हा त्या शेतकऱ्याचाच नातू औतावर बसण्यासाठी रडायचा..! गावातली ती परंपरा व सांस्कृतिच वेगळी होती,मामाच्या गावच्या यात्रेला जाणे ऊसाचा थंडगार रस व आंबट असे फोडणी दिलेले ताक याची चव चाखायला मिळायची,खेड्याच्या यात्रेतील ते बैलांच्या ऊसाच गुऱ्हाळ(रसवंती),रहात पाळणे, गावच्या खालच्या। आळीला त्या गारीगार वाल्याचा ए-रे..गारी गारवले हा आवाज ऐकताच ती बर्फाची कांडी चोखायची वेळ व्हायची,गावाकडे एकदाका ज्वारीची खळी पार पडली की गावातील मुलं मुली गुरे संभाळण्यासाठी शेतात जात,म्हशींवर बसायचे, मग त्या शेतात आंब्याला मधुर आंबे लागलेले असायचे सर्व गुराखी मुलं मुली आंब्याच्या वडाच्या झाडाला सुरपारुंबा खेळायची,लगुरे ,हुतुटु, लपंडाव,पोहणे,भोवरा इत्यादी अनेक खेळ खेळायची, दिवस मावळायच्या वेळेला पोरांच्या, चकारगाड्याची (जुने टायर, लाकडी बैलगाडीच्या चाकाची रिंग) चुरचुर व पोरांचा गोंगाट ऐकू यायचा… मुलं उन्हाळ्यात मामाच्या गावी यायचे मग रात्री त्यांची भलीमोठी जेवणाची पंगत बसायची वेगवेगळ्या पालेभाज्या ज्वारी बाजरी नाचणीच्या भाकरी गव्हाच्या पिठाचे धपाटे ज्वारी व बाजरीच्या पिठाच्या वड्या आमटी व तोंडाला पाणी सुटावे असे लोणचे अशा रोज जेवणाच्या पंगती बसायच्या,जेवणानंतर आज्जी मुलांना मुलींना कुशीत घेऊन राम-भीम श्रीकृष्ण, शिवरायांच्या गोष्टी सांगायच्या गोष्टीत नातवंडे झोपी जायची….. हे नक्कीच कुठेतरी लोप पावत आहे कारण ग्रामीण भाग म्हटलं की कसं वेगळं वाटायचं वेगळा भास व्हायचा लहान मुलांना शाळेला सुट्टी पडली की गावाला जाणे, मौजमजा करणे अशा गोष्टीकडे शाळकरी मुलांचा कल असतो. आज मात्र टीव्ही, मोबाईल फेसबुक व्हाट्अप,टिक-टॉक आणि स्मार्ट अत्याधुनिक पद्धतीच्या शिक्षणामुळे उन्हाळी क्लासेस यामध्ये मुले गुंतून रहातात. परिणामी शाळकरी मुलांना सामाजिक व्यवस्थेची आणि आपल्या जाणीव नाही. सुसज्ज व सुव्यवस्था असलेल्या शाळामध्ये मुले जात असल्याने त्यांना दैनंदिन जीवनातील आवश्यक कामांची माहिती मिळत नाही. अलिकडे मोबाईल, टी.व्ही, संगणक अशा प्रगत तंत्रज्ञानामधून मिळणाऱ्या शिक्षणाकडे मुलांचा ओढा वाढला आहे. यामुळे शाळांना सुट्टी असली की मुले यामध्ये गुंतवून रहात असल्याचे चित्र आज पहावयास मिळत आहे.
आपण जर एकदा मागच्या ग्रामीण सांस्कृतिकडे वळून पाहिले तर त्या आठवणींच्या खुणाही नष्ट होत आहेत,

इंजि.दत्ता बळीराम हुले
पाटोदा.मो.९९६०१३५६३४

One Comment

  1. धन्यवाद ..??
    संपादक सहसंपादक व पत्रकार यांचे मनःपूर्वक आभार..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button