प्रशासकीयब्रेकिंग न्युज

“जय श्रीराम”च्या जयघोषात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची विशेष रेल्वे ८०० यात्रेकरुंना घेऊन आयोध्येच्या दिशेने रवाना

आठवडा विशेष टीम―

धुळे, दिनांक 26 एप्रिल, 2025 (जिमाका वृत्तसेवा) :  राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतंर्गत विशेष रेल्वे गाडी जिल्ह्यातील आठशे भाविकांना घेऊन अयोध्येच्या दिशेने जय श्री राम”च्या गजरात रवाना झाली. राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून यात्रेची सुरुवात केली.

धुळे रेल्वे स्थानक येथे झालेल्या या कार्यक्रमांस खासदार डॉ. शोभा बच्छाव, आमदार मंजुळा गावित, अनुपभैय्या अग्रवाल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संजय सैंदाणे, जि.प समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय, आयआरसीटीसीचे  नवीन कुमार सिन्हा, इंडियन रेल्वे कॅटरींग ॲण्ड टुरीझम कॉर्पोरेशन, मुंबई प्रतिनिधी श्रीमती मृण्ययी, माजी महापौर जयश्री अहिरराव, प्रदिप कर्पे, गजेंद्र अंपळकर यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, यात्रेकरु, त्यांचे नातेवाईक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. रावल यांनी यात्रेनिमित्तच्या शुभेच्छा देताना सांगितले, राज्यातील सर्व धर्मियांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्याची इच्छा असते. परंतू गरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे वा कोणी सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. ही बाब विचारात घेऊन सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील 161 आणि भारतातील 88 तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राज्य शासनाने सुरु केली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना ही केवळ एक योजना नाही, तर वृद्धांचा सन्मान असून निवडणूकीवेळी जे बोललो ते करुन दाखविल्याचेही ते म्हणाले.

पालकमंत्री पुढे म्हणाले की, 1 कोटी 30 लाख रुपये खर्चातून तीर्थदर्शन यात्रा शासनामार्फत करण्यात येत आहे. तीर्थयांत्रामधून ज्येष्ठ नागरिकांना आयुष्याचे पुण्य मिळणार आहे, आणि त्याच्या माध्यमातुन आम्हालाही थोडे पुण्य लाभणार आहे. शासन तीर्थयात्रेच्या माध्यमातून श्रावण बाळाच्या भुमिकेत आहे. या देशाला मोठा सांस्कृतिक इतिहास आम्ही निभावत आहे. सर्वांची चारधाम यात्रा झाली पाहिजे त्यासाठी आमचे सरकार काम करत आहे. आपण सर्वजण सुखरुप जा आणि सुखरुप या, काही अडचण आली तर संपर्क साधण्याचे आवाहन करुन त्यांनी यात्रेकरुवर पुष्पवृष्टी केली.

यावेळी खासदार डॉ. बच्छाव यांनी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरीकांना अयोध्येतील प्रभु श्रीरामाचे दर्शनाची संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले. यावेळी आमदार मंजुळा गावित, अनुपभैय्या अग्रवाल यांनीही आपले मनोगत व्यक्त करुन यात्रेकरुंना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

धुळे रेल्वे स्थानकावर सकाळपासून अयोध्येला जाणाऱ्या प्रवाशांची लगबग होती. सर्व प्रवाशांना समाज कल्याण विभागामार्फत ओळखपत्र देण्यात आले. तसेच त्यांच्या बसण्याच्या ठिकाणासह त्यावर बोगी क्रमांक लिहिला होता. सर्व ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे श्रीराम मंदिर, अयोध्या धाम (उत्तर प्रदेश) प्रवास कालावधीत चहा, नाश्ता, भोजन, रहिवासची व्यवस्था राज्य शासनामार्फत मोफत करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथकासह प्रत्येक बोगीसाठी दोन समन्वयक नेमण्यात आले आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांचे पारंपरिक वाद्यांसह स्वागत करण्यात आले. यात्रेकरुंकडून जय श्रीरामचा जयघोष करण्यात येत असल्याने परिसर दुमदुमून गेला होता.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस पहलगाम येथे अतिरेकी हल्लयात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली.

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button