प्रशासकीय

संशोधनाच्या नवनव्या वाटा चोखाळाव्यात – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

आठवडा विशेष टीम―

अमरावती, दि. 25 :  युवकांमध्ये परिवर्तनाची शक्ती असते. त्यामुळे देशहित व मानवजातीच्या कल्याणासाठी योगदान देण्याचा संकल्प करावा. केवळ नोकरीचे ध्येय डोळ्यासमोर न ठेवता ‘स्टार्टअप’सारख्या उपक्रमशीलतेला चालना द्यावी. विद्यार्थ्यांनी ज्ञानाचे क्षेत्र अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी संशोधनाच्या नवनव्या वाटा चोखाळाव्यात, असे प्रतिपादन राज्यपाल व कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा अडतिवासा दीक्षांत समारंभ छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाला. राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी समारंभाला ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, अधिसभेचे मान्यवर सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

‘सर्वे भवन्तु सुखिनः’ हा श्लोक उद्धृत करत राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले की, मानवजातीच्या कल्याणाचा विचार मनात ठेवून त्यादृष्टीने आपल्या कार्याची दिशा विद्यार्थ्यांनी निश्चित करावी. समाज व देशाला आपल्याला काय देता येईल, याचा विचार करावा. आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी. प्रगतीसाठी ध्येय निश्चित असणे आवश्यक आहे. प्रत्येक कार्यात अडचणी येतच असतात. पण त्यावर मात करत पुढे गेले पाहिजे. परिवर्तनाची ताकद तरूणांमध्ये आहे. देशाला व समाजाला उन्नतीची दिशा देण्यासाठी नवे मार्ग शोधावेत. संशोधनाच्या नव्या वाटा चोखाळाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

देशसेवेचा संकल्प करा : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

शिक्षण घेऊन प्रगती साधत असताना आपल्या मायभूमीचा विसर पडता कामा नये. अनेकदा विद्यार्थी परदेशी जाऊन शिक्षण पूर्ण करतात व देशात परतत नाहीत. जगभर जाऊन शिक्षण व ज्ञान मिळवलेच पाहिजे; पण आपल्या गावाचा, समाजाचा, महाराष्ट्र व देशाचा विसर पडू नये. आपल्या ज्ञानाचा देश व समाजसेवेसाठी उपयोग व्हावा. त्यामुळे आजच्या दिनी तसा संकल्प करण्याचे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी केले.

अनेक महापुरुष, शूरवीर, संत महात्मे, विद्वान यांचा समृद्ध वारसा महाराष्ट्रभूमीला आहे. तो आदर्श विद्यार्थ्यांनी डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे. चित्रपटातील काल्पनिक पात्रांचे संवाद करमणूकीपुरते ठीक असतात. आपले आदर्श हे आपले महापुरुष असले पाहिजेत. महापुरूषांच्या विचार व कार्याचे सतत स्मरण करून समाजहित व देशसेवेसाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग होण्यासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.

यंदाच्या अंदाजपत्रकात अनेक उपक्रमांसाठी तरतूद : कुलगुरू डॉ. मालखेडे

विद्यापीठाच्या विकासासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात संशोधन अनुदान योजनसह दिव्यांगांच्या सोयी-सुविधेची तरतूद आहे. बुलडाणा येथील आदर्श पदवी महाविद्यालयासाठी विद्यापीठ निधीतून दीड कोटी रू., विद्यापीठ ग्रंथालयासाठी 3.69 कोटी, परिसर सुशोभीकरणासाठी 90 लक्ष रू., आयसीटी प्रकल्पासाठी 50 लक्ष रू., कुलगुरू अकादमिक गुणवत्ता पुरस्कार योजना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांसाठी बहुसुविधा केंद्र यासाठी 1 कोटी 75 लक्ष रू. आदी तरतुदींचा समावेश केला आहे, असे कुलगुरू डॉ. मालखेडे यांनी सांगितले.

55 हजार विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध गुणवंतांना 111 सुवर्णपदके, 22 रौप्यपदके, 21 रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. एकूण 55 हजार 19 विद्यार्थ्यांना पदवी व 125 विद्यार्थ्यांना पदविका प्राप्त झाली.

000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button