प्रशासकीय

पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते देहू येथे आरओ प्रकल्प व थेट दर्शनसेवेचा शुभारंभ

आठवडा विशेष टीम―

पुणे दि. १६: पर्यटन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते देहू येथे श्री संत तुकाराम महाराज संस्थान श्री क्षेत्र देहू व शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान  पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक आरओ प्रकल्पयुक्त पाणपोई व जगद्गुरु तुकोबारायांच्या थेट डिजिटल दर्शन सेवेचा शुभारंभ  करण्यात आला.

यावेळी आमदार सुनील  शेळके, उद्योगपती दिना धारिवाल, प्रकाश धारिवाल, श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष नितिन महाराज मोरे, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मोहनलाल खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, विश्वस्त संदीप राक्षे, स्मिता चव्हाण व देहूचे ग्रामस्थ उपस्थित होते.

राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, एलईडी पटलाच्या माध्यमातून भाविकांना  जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे  दर्शन घेता येईल.  कोरोनाच्या संसर्गामुळे गेल्या दोन वर्षात आषाढी पालखी सोहळा  झाला नव्हता. यंदा मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरीच्या वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे. गर्दीमुळे सर्वच भाविकांना दर्शन घेता येत नाही. त्यामुळे नवी सुविधा उपयुक्त ठरेल. पाणपोईच्या माध्यमातून भाविकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी पुरेशा प्रमाणात मिळू शकेल. अशी सेवा देणे कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.

संत तुकाराम महाराजांचे शिल्प इंद्रायणी नदीत उभे करण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी  आवश्यक  प्रस्ताव सादर करण्यात यावा. भाविकांची वाढती संख्या पाहून भाविकांसाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचेही त्या म्हणाल्या. आमदार शेळके  यांनीदेखील यावेळी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button