आठवडा विशेष टीम―
मुंबई, दि. 18 : मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 20 ऑगस्ट, 2022 रोजी महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई शहर परिसरातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजक उमेदवारांनी या यात्रेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रविंद्र सुरवसे यांनी केले आहे.
मुंबई शहरामध्ये 20 ऑगस्ट, 2022 रोजी स. 10.00 ते सायं. 6.00 वाजेपर्यंत मुंबई विद्यापीठ, फोर्ट, एच.आर.कॉलेज व चर्चगेट, हिंदुजा कॉलेज, चर्नीरोड, आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी सादरीकरण होईल. स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे सादरीकरण करणाऱ्या प्रतिभागीपैकी जिल्ह्यातून अव्वल 3 विजेते घोषित केले जातील. जिल्हास्तरीय पारितोषिकाचे स्वरूप प्रथम रु. 25 हजार, द्वितीय रु. 15 हजार आणि तृतीय रु. 10 हजार असे राहिल. तसेच सर्वात्तम 10 (अव्वल 3 विजेत्यांसह) सहभागींना राज्यस्तरावर सादरीकरणाची संधी मिळेल.
महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व नवउद्योजक हे जिल्हास्तरीय सादरीकरण सत्राच्या प्रत्यक्ष ठिकाणी किंवा www.msins.in या संकेतस्थळावर आपला अर्ज सादर करू शकतात. तसेच याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या (022) 22626303 या दुरध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन, श्री. सुरवसे यांनी केले आहे.
राज्यातील नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत “महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण-2018” जाहिर करण्यात आले आहे. या धोरणाच्या माध्यमातून राज्यामध्ये स्टार्टअपच्या विकासाकरिता पोषक वातावरण निर्मिती करून त्यातून यशस्वी उद्योजक घडविण्याकरीता तसेच राज्यातील नागरिकांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी कौशल्य, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत संपूर्ण राज्यात “महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रेचे” आयोजन करण्यात आले आहे.
00000
इरशाद बागवान/विसंअ/18.8.22