मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बालवाड्यांची कार्यपद्धती अंगणवाड्यांच्या दर्जाची करावी

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि. 22 : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बालवाड्यांच्या सशक्तीकरणासाठी महिला बालविकास विभाग व मुंबई महानगरपालिका यांचे समन्वयाने काम सुरू आहे. महिला व बाल विकास विभागाने, राज्यातील सर्व अंगणवाडीचे जिओ मॅपिंग (अक्षांश-रेखांश) चे काम पूर्ण केले आहे, ह्याच पद्धतीने मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व बालवाड्यांची सुद्धा मॅपिंग करून त्यांची कार्यपद्धती अंगणवाड्यांच्या दर्जाची करावी, असे  महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिला व बालविकास विभागाअंतर्गत कार्यरत अंगणवाडी व मुंबई महानगरपालिकेमार्फत चालविण्यात येणाऱ्या बालवाड्या यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याच्या अनुषंगाने  बैठक घेण्यात आली.

या बैठकीस प्रधान सचिव आय. ए. कुंदन, आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना तथा व्यवस्थापकीय संचालक, महिला आर्थिक विकास महामंडळ रुबल अग्रवाल, उपसचिव विलास ठाकूर, सहआयुक्त, मुंबई महानगरपालिका अजित कुंभार आदी  उपस्थित होते.

महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा म्हणाले, महानगरपालिकेमार्फत मुंबई शहर आणि उपनगर भागातील चालवण्यात येणाऱ्या बालवाड्या या महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांच्या दर्जाच्या करण्यात याव्यात. जेणेकरून बालवाडीमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या आरोग्याची आणि पोषणाची काळजी घेतली जाईल. याकरिता महिला व बालविकास विभागाच्यावतीने आदर्श कार्यपद्धती तयार करण्यात यावी. ही कार्यपद्धती मुंबई महानगरपालिकेला कार्यवाहीसाठी पाठवण्यात यावी. महानगरपालिका क्षेत्रातील बालवाड्यांचे जिओ मॅपिंग पंधरा दिवसाच्या आत करण्याच्या सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.

महानगरपालिकेच्या महिला व बालविकास निधीतून बालकांची वजन व उंची मोजण्यासाठीचे साहित्य सर्व बालवाड्यांसाठी खरेदी करून बालवाड्यांना उपलब्ध करून द्यावे. साहित्य कशा पद्धतीने घ्यायचे याची माहिती आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांनी मुंबई महानगरपालिकेला द्यावी.  आदिवासी  क्षेत्रातील अंगणवाडीतील मुलांना खेळणी देण्यासाठी बाल विकास सेवा योजना आयुक्त कार्यालयात व महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा कार्यालयात देणगी कक्ष तयार करण्यात यावा, असेही निर्देश मंत्री श्री. लोढा यांनी यावेळी दिले.

००००

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.