प्रशासकीय

बोर्लीपंचतन तालुका क्रीडा संकुल लोकार्पण व प्राचीन गणपती मंदीर भूमीपूजन सोहळा उत्साहात संपन्न

आठवडा विशेष टीम―

अलिबाग,दि.18(जिमाका):-  श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील तालुका क्रीडा संकुलाचा लोकार्पण  सोहळा व प्राचीन गणपती मंदीर भूमीपूजन पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते शुक्रवार, दि.17 जून रोजी उत्साहात संपन्न झाला.

ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे व त्यातून दर्जेदार खेळाडू निर्माण होऊन राज्य व देश पातळीवर त्यांनी आपल्या कौशल्याने आपल्या गावाचे व पर्यायाने देशाचा नावलौकिक वाढवावा, यासाठी तालुका व गाव पातळीवर क्रीडा संकुल असणे गरजेचे होते. यासाठी वेळोवेळी मागणी केली जात होती. या क्रीडा संकुलासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न बोर्लीपंचतन  येथील दानशूर व्यक्तिमत्त्व  रविंद्र कुलकर्णी यांनी आपल्या मालकीची तीन एकर जागा देऊन सोडविला.

दि.3 मे 2013 रोजी या क्रीडा संकुलाचे भूमीपूजन करण्यात आले होते. निधी व अन्य विविध कारणांमुळे या क्रीडा संकुलाच्या इमारतीचे काम पूर्ण होवू शकले नव्हते. मात्र पालकमंत्री कु. तटकरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे काम आता पूर्ण झाले असुन या क्रीडा संकुलामध्ये विविध खेळांसाठी साहित्य व क्रीडांगणाच्या कामासाठी आणखीही निधी मंजूर करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे बोर्ली पंचतन येथील गणपती मंदिराच्या प्राचीन धर्तीवरील बांधकामासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाकडून प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत 66 लाख 32 हजार रुपये निधी मंजूर झाला आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्य पातळीवर यश मिळविलेला खेळाडू आर्यन पाटील व त्याचे प्रशिक्षक इंझामाम हक, त्याचप्रमाणे या क्रीडासंकुलासाठी मोफत जागा देणारे श्री. रविंद्र कुलकर्णी यांचा विशेष सत्कार पालकमंत्री कु.तटकरे तसेच खासदार श्री.सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, तहसिलदार सचिन गोसावी, तालुका क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर, श्रीवर्धन प्रभारी तालुका क्रीडा अधिकारी  संदीप वांजळे,  क्रीडा अधिकारी सचिन निकम, सरपंच ज्योती परकर, ग्रामपंचायत सदस्य, गणपती देवस्थान समिती अध्यक्ष सुजित पाटील,सुशील पाटील,मंदीर समितीचे पदाधिकारी, महंमद मेमन, लालाभाई जोशी,उदय बापट,सुकुमार तोंडलेकर, मंदार तोडणकर,नंदू पाटील, सचिन किर, दर्शन विचारे आदींची उपस्थिती होती.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button