प्रशासकीयब्रेकिंग न्युज

पानिपत येथे मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय – मंत्री ॲड. आशिष शेलार

आठवडा विशेष टीम―




मुंबई, दि. १३: पानिपतच्या ‘काला अंब’ परिसरात मराठा शौर्य स्मारक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या ऐतिहासिक पराक्रमाचे स्मरण आणि सन्मान करण्यात येणार आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, पानिपतच्या तिसऱ्या लढाईला 354 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 14 जानेवारी, 2025 रोजी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाच्या उभारणीबाबत आश्वासन दिले होते. मराठा साम्राज्याने सतराव्या आणि अठराव्या शतकात भारताच्या विविध भागात आपले साम्राज्य निर्माण केले होते. त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी स्थळे अनेक ठिकाणी असल्याचे त्यांनी सांगितले.

‘काला अंब’ स्मारकाच्या विस्तारासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असल्याचे मंत्री ॲड शेलार यांनी सांगितले. त्याचबरोबर या ठिकाणी मराठा शौर्याचे प्रतीक असणारे भव्य संग्रहालय, दृकश्राव्य कार्यक्रम आणि इतर आवश्यक सुविधाही निर्माण करण्यात येणार आहे. या कामासाठी निधीची कमतरता येणार नसल्याचेही मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

या प्रकल्पाकरिता हरियाणा राज्य सरकारशी समन्वय साधण्यासाठी राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल हे समन्वयक तर जमीन अधिग्रहनाचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत केले जाणार असून पर्यटन विभाग ‘नोडल’ म्हणून काम करणार आहे. या स्मारकाच्या माध्यमातून मराठा साम्राज्याच्या जाज्वल्य इतिहास माहिती व्हावा यासाठी उपक्रम राबविण्यात येतील. पर्यटन मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञांची समितीही गठित करण्यात येणार आहे. या स्मारकाच्या उभारणीमुळे मराठा शौर्याचा वारसा जतन होईल आणि येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या महान इतिहासाची माहिती मिळेल, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी सांगितले.

०००

संजय ओरके/विसंअ/







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button