प्रशासकीयब्रेकिंग न्युज

वीर जवान रामदास बढे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

आठवडा विशेष टीम―

अहिल्यानगर/शिर्डी, दि. २६: जम्मू – काश्मीरमधील भारत – पाकिस्तान नियंत्रण रेषेवर कर्तव्यावर असताना शहीद झालेले संगमनेर तालुक्यातील मेंढवन गावचे सुपुत्र रामदास साहेबराव बढे यांच्यावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो नागरिकांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

रामदास साहेबराव बढे (वय ४४) लष्कराच्या ३४ एफडी रेजिमेंटमध्ये हवालदार पदावर कार्यरत होते. तंगधार सेक्टरमध्ये सोमवारी (दि. २४ मार्च) कर्तव्य बजावत असताना रामदास बडे यांना वीरमरण आले. आज (दि.२६ मार्च) सकाळी त्यांचे पार्थिव मेंढवन येथे आणण्यात आले. लष्कर आणि स्थानिक प्रशासनाच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.

भारतीय लष्कराच्या मराठा फिल्ड रेजिमेंट व पोलिसांच्या पथकांनी हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली. ‘भारत माता की जय’ आणि ‘शहीद रामदास बढे अमर रहें’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. मुलगा ऋषिकेश व भाऊ संदीप यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे, पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, तहसीलदार धीरज मांजरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्यासागर कोरडे, निलम खताळ, लष्कराच्यावतीने मेजर आर. व्ही. राठोड, तसेच इतर मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून शहीद बढे यांना श्रद्धांजली वाहिली.

”रामदास बढे यांनी देशासाठी दिलेले बलिदान आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात प्रशासन सहभागी असून कुटुंबियांना शासन सर्वतोपरी मदत करेल” अशा शब्दात जिल्हाधिकारी आशिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शैलेश हिंगे, बाळासाहेब थोरात यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या.

हवालदार रामदास बढे हे वयाच्या २० व्या वर्षी सैन्यदलात भरती झाले होते. त्यांनी पश्चिम बंगाल, आसाम, सिक्कीम, जम्मू -काश्मीर व महाराष्ट्र या राज्यात सेवा बजावली होती. त्यांच्या पश्चात आजी, आई, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button