नवी दिल्ली दि.२७:आठवडा विशेष टीम― मराठा समाजाच्या शिक्षण आणि नोकरी मधील आरक्षणाला आक्षेप घेणाऱ्या सर्व याचिका बरखास्त करून मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या राज्य शासनाने केलेल्या कायद्याला वैध ठरविणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.
मराठा समाजाला आर्थिक निकषावर शिक्षण आणि नोकरी मध्ये आरक्षण देण्याच्या मागणीला आपण सर्वप्रथम पाठिंबा दिला होता. अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षणाची मर्यादा वाढविली जाऊ शकते.त्यानुसार मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्ग करून आर्थिक निकषावर आधारित आरक्षण देण्यात यावे अशी रिपाइंची भूमिका राहिली आहे.न्यायालयात राज्यशासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या कायद्याची खूप मजबुतीने अभ्यासपूर्ण चांगली बाजू मांडली त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ना रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सातत्याने मराठा आंदोलकांनी आग्रही भूमिका घेतली त्यांच्या सनदशीर मार्गाच्या लढ्याचा हा विजय आहे असे ना रामदास आठवले म्हणाले.