परळी:आठवडा विशेष टीम―येथील नविन शक्तीकुंज वसाहतीतील विद्यावर्धिनी विद्यालय येथे आज शुक्रवार दि.12 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त बाल दिंडी व वृक्षारोपण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
स्वर्गातील देव देवीकांनाही पृथ्वीवर येण्याचा मोह अनावर व्हावा, असा भक्तीचा सागर आज विद्यावर्धिनी विद्यालयाच्या प्रांगणात उसळला.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यावर्धिनी विद्यालय, नविन शक्तीकुंज वसाहत, परळी येथे आज बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. निर्मळ अंत:करणी, गोपीचंदन टिळाधारी, तुळशीहारधारी छोटे भक्तगण,वारकरी सर्व संतासमावेत (वेशभूषेत) सहभागी झाले होते.
त्यांच्या टाळमृदुंगासह हृदयातुन उमटणाऱ्या विठ्ठलनामाच्या जयघोषाने सारा आसमंत दुमदुमला. तेव्हा हा आनंद सोहळा बघण्यासाठी अनेक पालक उपस्थित होते. पालखी सोहळ्याचे आकर्षक असलेले गोल रिंगण ही येथे करण्यात आले.
या बाल दिंडी सोहळ्याचे उदघाटन परळी शहराच्या प्रथम नागरिक सौ. सरोजिनीताई हालगे, तसेच औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता राऊत, परळी नगर परिषदेचे शिक्षण सभापती संजय फड, औ.वि. केंद्राचे कल्याणाधिकारी वासुदेव यांच्या हस्ते पूजन व श्रीफळ वाढवून करण्यात आले. आषाढी एकादशीचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यावर्धिनी विद्यालयाच्या प्रांगणात पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण ही करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव इटके, संचालक भिंगोरे, एम.टी.मुंडे, पैंजणे, मुख्याध्यापक मातेकर, नांदूरकर, सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.