किर्तनाला मोंढा मैदानावर अलोट जनसमुदायाची उपस्थिती
परळी:आठवडा विशेष टीम―पावसाची सर्वच नक्षत्रं कोरडी गेली, नदी-नाले कोरडे पडले. आज चातक पक्षा प्रमाणे आपण पावसाची वाट पाहत आहोत. मुळात पाऊस न पडण्यासाठी आपणच कारणीभुत असून वाढत चाललेली वृक्षतोड, त्यामुळे निर्माण झालेला निसर्गातील असमतोल आणि जन्मदात्या आई-वडिलांची सेवा करण्यात कमी होत चाललेले प्रमाण हेच पाऊस न पडण्यामागचे कारण आहे. आपण निसर्गाचा समतोल, आणि आई-वडिलांचा आदर राखावा असे आवाहन निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनीकेले.दरम्यान,आधार महोत्सवाने नेत्यांचा वाढदिवस करणे हा समाजा साठी आदर्श असल्याचे ही गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते आ.अजित पवार व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १५ ते २२ जुलै विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या महोत्सवा अंतर्गत समाजप्रबोधनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मोंढा मैदानावर अलोट जन समुदायाची उपस्थिती होती.
आपल्या खास व मार्मिक शैलीतून महाराजांनी विविध सामाजिक अनिष्ट गोष्टींवर प्रहार करून प्रबोधन करण्याच्या दृष्टीने खोचक पद्धतीने प्रहार केला.
परळीत सातत्याने किर्तन सेवा करताना आपल्याला आनंद वाटतो असे सांगत महाराजांनी बिघडत चाललेला निसर्गाचा असमतोल आणि आई-वडिलांचा दुर्दैवाने वाढत चाललेला अनादर, हाती पैसा आला की माणूस बिघडतो, त्याला मस्ती चढते. या मस्तीत माणूस नको त्या गोष्टी करतो आणि पाप ओढवून घेतो. आपण दुष्काळ पडला की निसर्गाला दोष देतो परंतु, निसर्ग का बिघडला याचा विचार करीत नाही असे ते म्हणाले. आधार महोत्सवा सारखेलोकोपयोगी उपक्रम राबवून आपल्या नेत्यांचा वाढदिवस करणे हा समाजासाठी आदर्श असून या प्रकारचे सेवाकार्य समाजातील गरजूंना खरोखरच आधार देणारे ठरतात असे कौतुक त्यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकारी यांनी महाराजांचा सत्कार केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाल्मिक अण्णा ,लक्ष्मण पौळ , नितीन कुलकर्णी आदीनी परिश्रम घेतले .
कार्यक्रमाला परिसरातील भजनी मंडळी, भाविक, मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोंढा मैदानावर किर्तनासाठी रसिक श्रोत्यांनी अलोट गर्दी केली होती.