ब्रेकिंग न्युज

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था माझी आहे ; सर्वोतोपरी सहकार्य करणार―पंकजाताई मुंडे

अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेशी महाजन व मुंडे परिवाराचे नाते व स्नेहभाव हा जुना आहे. भाशिप्र संस्था ही एक परिवार असून ही ओळख व संस्थेचे संस्कार कदापीही विसरता येणारे नाहीत कारण ते रक्तात भिनलेले आहेत.याच संस्थेतून दिवंगत मुंडे साहेबांना प्रवाहाविरूद्ध पोहण्याचे विचार, बाळकडु मिळाले असे सांगुन भाशिप्रने दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरवू,भारतीय शिक्षण प्रसारक संस्था माझी आहे त्यामुळे संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालकल्याण, ग्रामविकास तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी दिली.त्या भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्‍वर महाविद्यालयातील विस्तारीत इमारत भूमिपुजन समारंभ प्रसंगी बोलत होत्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाशिप्र संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर तर व्यासपीठावर संस्थेचे कार्यवाह नितीन शेटे, बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजकिशोर मोदी, उपनगराध्यक्षा सौ. सविताताई लोमटे, संस्थेच्या केंद्रिय कार्यकारीणीचे सदस्य आप्पाराव यादव, स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.किशोर गिरवलकर, कार्यवाह बिपीन क्षीरसागर, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी,प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, प्रविणदादा घुगे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.यावेळी महाविद्यालयाच्या वतीने पालकमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर,स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह बिपीन क्षीरसागर,आशिषकुमार जैन यांनी तसेच इतर मान्यवरांचे पी.आर. कुलकर्णी,अ‍ॅड.किशोर गिरवलकर,आप्पाराव यादव,प्रा.रोहिणी अंकुश,अनुपमा जाधव यांनी स्वागत केले. स्वागताचे स्वरूप तुळशीचे रोप, सन्मानचिन्ह, महाविद्यालयाचा वार्षिकांक असे होते.
प्रास्ताविक करताना महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राम कुलकर्णी यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई यांच्याकडे गेल्यानंतर विकासाचे प्रत्येक काम तात्काळ मार्गी लागते असे सांगुन भाशिप्र संस्थेच्या प्रगतीत ताई आपले सातत्याने योगदान देत आहेत.हे सांगुन राखी पौर्णिमेनिमित्त भावाने बहिणीला भेट देण्याची प्रथा आहे.परंतु, यावेळीही आमची कर्तृत्ववान बहिणच भावाला भेट देणार आहे.महाविद्यालयाच्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सांस्कृतिक सभागृहासाठी खासदार फंडातुन पंकजाताईंनी 25 लक्ष रूपये द्यावेत अशी यावेळी अपेक्षा व्यक्त केली.या प्रसंगी बोलताना राजकिशोर मोदी यांनी भाशिप्र संस्था ही राष्ट्रभक्ती व राष्ट्रप्रेमाचे धडे देणारे संस्कार केंद्र असल्याचे सांगुन या संस्थेतुन दिवंगत प्रमोदजी महाजन,दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्यासारखे राष्ट्रीय नेतृत्व निर्माण झाले. विविध उपक्रम ही संस्था राबविते. राज्याच्या राजकारणात ना.पंकजाताईंचे कार्य हे सर्वांना सोबत घेवून विकासाची प्रक्रिया गतीमान करणारे आहे. यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्याचा भरिव असा विकास होत आहे असे सांगुन तुम्ही व आम्ही आपण सर्वजण मिळून अंबाजोगाईचे शैक्षणिक गतवैभव परत मिळवू असे सांगुन मोदी यांनी भाशिप्र संस्थेस सहकार्य करण्याचे अभिवचन यावेळी दिले.अध्यक्षीय समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर यांनी संघ विचारातुन प्रेरणा घेवून शिक्षण क्षेत्रात संस्थेचे कार्य सुरू असल्याचे सांगुन नागरीक घडविण्याच्या प्रक्रियेत संस्थेचे योगदान आहे. पंकजाताईंचे कार्य हे धाडस आणि धडाडीचे प्रतिक आहे.संस्थेच्या वाटचालीत मुंडे परिवाराचा एक स्वयंसेवक म्हणुन सहभाग राहिला आहे. संस्थेला आव्हाने स्विकारण्याची व त्यावर मात करण्याची मोठी परंपरा आहे.संस्था कोणाकडे काहीही मागत नाही. संस्थेच्या प्रगतीत ना.पंकजाताई पुढील काळात स्वतः लक्ष देतील यासाठी परमेश्‍वर त्यांना अधिक शक्ती प्रदान करो अशी प्रार्थना केली.या प्रसंगी पालकमंत्री व मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धेत उज्वल कामगिरी करणार्‍या कु.मानसी कुलकर्णी व कु.सुनिता माने या वाणिज्य शाखेच्या दुसर्‍या वर्षात शिकणार्‍या खेळाडुंचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.अजय चौधरी व अ‍ॅड.मकरंद पत्की यांनी करून उपस्थितांचे आभार स्थानिक व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.किशोर गिरवलकर यांनी मानले.वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.
प्रारंभी खोलेश्‍वर महाविद्यालय विस्तारीत इमारत भूमिपुजन समारंभ पालकमंत्री ना.पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या हस्ते विधीवत पुजा करून संपन्न झाला. स्व.नाना पालकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने भाशिप्र संस्थेच्या सर्व संकुलामध्ये समर्पण वर्ष म्हणुन साजरे होत असल्याने नानांच्या विचारांना व कार्याला उजाळा मिळावा म्हणुन खोलेश्‍वर विद्यालयातील शिक्षकांच्या वतीने ‘गाथा समर्पणाची’ हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमास पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी उपस्थिती दर्शवून कलावंतांना प्रोत्साहन दिले.जयेंद्र कुलकर्णी, संतोश बिडकर,किरण भावठाणकर यांनी गिते गायली तर त्यांना सहगायीका म्हणुन तनुजा काळे,सिद्धी लोमटे,श्रद्धा निकम, भार्गवी जहाँगीर,साक्षी द्रुकर,गौरी कोनार्डे यांनी साथ दिली. रत्नदीप शिगे यांनी तबल्यावर साथसंगत केली.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रृती देशपांडे व कल्पना कांबळे यांनी केले.या कार्यक्रमास प्रसिद्ध पखावज वादक पं.उद्धवबापु आपेगावकर,बीड पुर्वचे जिल्हा संघचालक प्रा.उत्तमराव कांदे, प्रकाश जोशी,संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेंद्र आलुरकर,कार्यवाह नितीन शेटे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

खोलेश्‍वर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहास 25 लक्ष रूपयांचा निधी देणार -ना.पंकजाताई मुंडे

संस्थेशी असलेला ऋनाणुबंध व रामभाऊ कुलकर्णी यांनी केलेला आग्रह यामुळे खोलेश्वर महाविद्यालयाच्या लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे सांस्कृतिक सभागृहासाठी खा.डॉ. प्रितमताई मुंडे यांच्या खासदार फंडातुन 25 लक्ष रूपयांचा निधी देणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी दिली.या निमित्ताने परिवारात काम करण्याची मोठी संधी मिळत असल्याचे सांगुन त्यांनी समाजासमोर नवे आदर्श पुढे येण्याची आवश्यकता प्रतिपादीत केली.अंत्योदयाचा विचार घेवून आदरणीय पंतप्रधानांचे कार्य सुरू आहे.370 कलम रद्द करणे हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगुन काश्मिर मध्ये तिरंगा सन्मानाने फडकावा हे प्रत्येक भारतीयाचे स्वप्न मोदी सरकारने पुर्ण केल्याचे सांगुन भाशिप्र संस्थेशी आपले जन्मापासुनचे नाते आहे.या ठिकाणी आल्यावर मनात मांगल्याची भावना व भरभरून आशिर्वाद मिळतात अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button