पंकजाताई मुंडे यांनी परळीत बचतगटांच्या महिलांना दिली ताकद अन् कानमंत्र !
प्रज्वला योजनेतंर्गत बचतगट प्रशिक्षणाचे थाटात उदघाटन
परळी दि. २४:आठवडा विशेष टीम― पुरूषांनी कमवायचे आणि बायकांनी बसून रहायचे हा जमाना आता गेला आहे, महिला सुध्दा आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकते, घराचा उंबरठा ओलांडून यशस्वी होऊ शकते हे सिद्ध झाले आहे त्यामुळे महिलांनो, मागणारे हात होऊ नका, स्वतः सक्षम होऊन कुटूंबाचा आधार बना अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी आज बचतगटांच्या महिलांना कानमंत्र देत मी तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी असल्याचे सांगत ताकदही दिली.
राज्य महिला आयोगाच्या वतीने प्रज्वला योजनेतंर्गत बचतगटांच्या प्रशिक्षणाचे उदघाटन पालकमंत्री ना पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज वैद्यनाथ प्रतिष्ठानच्या सभागृहात झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. खासदार डाॅ प्रितमताई मुंडे, बाल हक्क आयोगाच्या सदस्या डाॅ शालिनी कराड, महिला आयोगाच्या प्रतिनिधी मिनाक्षी पाटील, सविता कुलकर्णी, नगरसेविका उमाताई समशेट्टे, पं.स. सदस्य भरत सोनवणे, मुरलीधर साळवे आदी यावेळी उपस्थित होते.
बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी महिला बालविकास विभागाच्या वतीने प्रज्वला योजना सुरू करण्यात आली आहे, आणि हयाची सुरवात परळीतून होतेय याचा मला जास्त आनंद होत आहे असे ना. पंकजाताई मुंडे यावेळी म्हणाल्या. बचतीत खूप शक्ती आहे, स्त्रियांमध्ये मुळातच हा गुण असतो, त्यामुळे तिला ताकद दिली पाहिजे हे ओळखून आम्ही बचतगटांची चळवळ आम्ही गतीमान केली, त्यासाठी विविध योजना अंमलात आणल्या. समाजाने स्त्रीला नेहमीच दुय्यम दर्जा दिला परंतु देशाची पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, ग्रामविकास मंत्री अशा विविध जबाबदा-या तिने यशस्वीपणे पार पाडल्या आणि समाजापुढे आदर्श निर्माण केला. बचतगटांच्या महिलांना आम्ही व्यवसायासाठी शुन्य टक्के दराने कर्ज दिले,ज्यामुळे ती आज ताकदीने उभी राहिली असे त्या म्हणाल्या.
एक हजार गायींचे करणार वाटप
ना. पंकजाताई मुंडे पुढे बोलतांना म्हणाल्या की, आतापर्यंत बचतगटांना कुक्कूटपक्षांचे वाटप, शेळ्या, शिरखुर्मा तयार करण्याचे साहित्य वाटप केले, आता एक हजार गायी मी देणार आहे, या सर्व गायी रेल्वेने येणार असून पुढील आठवड्यात महिलांना गायी मिळतील यातून त्यांनी दूधाचा व्यवसाय करत स्वतःची आर्थिक ताकद वाढवायची आहे. महिलांची ताकद मोठी आहे, त्यांना योग्य दिशा देऊन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असल्याचे त्या म्हणाल्या.
मुक्त संवादाने महिला भारावल्या
ना. पंकजाताई मुंडे यांनी यावेळी बचतगटांच्या महिलांशी मनमोकळा संवाद साधला, त्यांना विविध प्रश्न विचारले तसेच त्यांच्या सध्या सुरू असलेल्या व्यवसायाची माहिती घेतली. हया मनमोकळ्या संवादाने महिला देखील बोलत्या झाल्या. महिलांच्या शंकांचे समाधान करा, त्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा अशा सूचना त्यांनी यावेळी अधिका-यांना दिल्या. यावेळी गट विकास अधिकारी लोखंडे, भाजपच्या प्रिती लेणेकर, सुशीला फड, विमल जाधव, मंगला लिंगाडे आदीसह बचतगटांच्या महिलांनी मोठी गर्दी केली होती. माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून ना.पंकजाताई मुंडे यांनी यावेळी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.