कोरोना विषाणू - Covid 19जळगाव जिल्हापाचोरा तालुकाब्रेकिंग न्युज

कोरोना विषाणुचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी पाचोरा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार सौ.सुरेखा महाले यांचा देशाला व सर्व दुकानदारांना दिशादर्शक ठरणारा अभिनव उपक्रम

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― जगभर पसरत असलेला कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र, राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्ह्यातील नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. याचे फलीत म्हणून जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील देशमुखवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार सौ. सुरेखा संजय महाले यांनी धान्य वाटप करणेसाठी अभिनव कल्पना अंमलात आणून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचा अभिनव उपक्रम देशाला घालून दिला आहे.

सौ. सुरेखा महाले यांनी आपल्या दुकानात स्वस्त धान्य वाटप करण्यासाठी एक मोठे नरसाळे आणि स्वतंत्र पाईप ठेवले आहे. लाभार्थी दुकानात आल्यावर दुकानदार ई-पॅास मशिनद्वारे स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून लाभार्थ्यासमोर धान्य मोजतात. त्यानंतर लाभार्थ्यास पाईपच्या दुस-या टोकास पिशवी लावणेस सांगितले जाते. लाभार्थीनी पाईपच्या दुस-या टोकास पिशवी लावल्यानंतर त्या दुकानातून मोठ्या नरसाळ्यातून धान्य सोडतात. हे धान्य नरसाळ्यातून आपोआप लाभार्थीच्या पिशवीत पडते. यामुळे Social Distancing होत असुन लाभार्थ्यांना उभे राहण्यासाठी ५फुट अंतरावर चौकोन तयार करण्यात आले आहे. लाभार्थ्यांनी रांगेत या चौकोनातच उभे राहण्याच्या सूचनाही त्या सर्वांना देतात. जळगाव जिल्ह्यात या अभिनव उपक्रमाचे स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.
देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्या प्रतिबंध करण्यसाठी केंद्र शासनाने देशभरात लॉकडाऊन जाहिर केला आहे. तसेच नागरीकांनी या कालावधीत सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्याही सुचना दिलेल्या आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील लाभार्थ्यांना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून स्वस्त धान्य दुकानदारांना स्वत:चे आधार अधिप्रमाणित करून धान्य वाटपाची सुविधा ई-पॅास उपकरणावर उपलब्ध करून देण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पुरवठा विभागास धान्य वाटप करतांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सुचना दिल्यात. जिल्ह्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी या निर्णयाची जिल्हाभर काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सुचना स्वस्त धान्य दुकानदार यांना दिल्या. त्यानुसार मीच माझा रक्षक माणून सौ. सुरेखा महाले यांनी आपली, आपल्या कुटूंबाची व ग्राहकांची सुरक्षितता ओळखून हा उपक्रम राबविण्याचा निश्चय केला आहे.
जळगाव जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मार्च / एप्रिल २०२० चे धान्य वाटप सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सर्व १८३४स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना निर्गमित करणेत आल्या आहेत. धान्य वाटप करतांना Social Distancing चे पालन करावे, गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी, लाभार्थ्यांमध्ये किमान 3 फूटाचे अंतर ठेवावे, दुकानदारांनी वाटप करतांना मास्कचा वापर करावा, तसेच धान्य् वाटप करतांना वारंवार आपले हात स्वच्छ धुवावेत आदि सूचना देणेत आल्या आहेत. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार या सूचनांचे पालन करत असुन काही दुकानदारांनी धान्य वाटप करणेसाठी अधिक खबरदारीचा उपाय योजल्याचे सौ. महाले यांच्या कल्पनेवरुन लक्षात येते.
श्रीमती महाले यांना ही कल्पना कशी सुचली याबाबत विचारले असता, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी, तसेच तहसीलदार पाचोरा, पुरवठा अधिकारी आणि पुरवठा निरिक्षक, पाचोरा यांनी केलेल्या आवाहनानुसार मीच माझा रक्षक माणून लाभार्थ्यांना काही अंतर ठेऊन धान्य वाटप कसे करता येईल यावर विचार केला. काही दिवस पिठाची चक्की चालविली असल्याने यातूनच ही अभिनव कल्पना सुचल्याचे सौ. महाले यांनी सांगितले. या उपक्रमासाठी पत्रा, पाईप, एलबो, रिबीट आणि स्टॅंड यासाठी रू. ९४५रू तर मजुरीसाठी रूपये ७००/रूअसा एकूण १६४५ रुपये खर्च आल्याचे त्यांनी सांगितले. श्रीमती सुरेखा संजय महाले या पाचोरा शहरात गेल्या २० वर्षापासुन स्वस्त धान्य दुकान चालवितात. त्यांचेकडे एकूण ४७० लाभार्थी असुन हे लाभार्थी पण माझ्याच कुटूंबाचे घटक आहे. त्यांची सुरक्षितता ही माझी सुरक्षितता असल्याने मीच माझा रक्षक या उक्तीप्रमाणे ही कल्पना राबविल्याचेही सौ. महाले यांनी सांगितले. माझ्या या अभिनव उपक्रमाची जिल्हा प्रशासनाबरोबर शासनस्तरावरून अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी विशेष दखल घेतल्याने मी आनंदी आहे...