ढगफुटीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देणार – आ.किशोर पाटील

पाचोरा:ज्ञानेश्वर धोंडू पाटील― ढगफुटीमुळे सातगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पहाणी आमदार किशोर पाटील, जि. प. सदस्य मधुकर काटे, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे ,तालुका कृषी अधिकारी ए.व्ही.जाधव यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या पिकांची पाहणी करून पंचनामे करण्याचे दिले आदेश.

गुरुवारी १६ रोजी अजिंठा डोंगराच्या माळा असलेल्या पर्वतावर ढगफुटी झाल्याने याच पर्वतातून उगम पावणाऱ्या सोयगाव तालुक्यातून वाहणाऱ्या नांदगाव तांडा येथील लघु पाटबंधारे धरण पूर्ण भरल्यानंतर तसेच याच पर्वतामध्ये आई जोगेश्वरी मातेच्या मंदिराजवळून उगम पावणाऱ्या दगडी नदी आणि बामणी नद्यांनी घोसला येथील धरण पूर्ण भरल्याने एकाच वेळेस धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत होता. तिन्ही नद्यांनी पाचोरा महसूल विभागाच्या क्षेत्रात इंद्रायणी नदी, दगडी नदी, बामणी नदी आदी नद्यांनी प्रवेश करून रुद्र रूप धारण केले होते. त्यामुळे सातगाव, तांडा, गहुले गावातील शेतकऱ्यांचे अतोनात पिकांचे नुकसान झाले आहे. नद्यामध्ये पाणी बसणे कठीण झाल्याने, तसेच नद्यांचा प्रवाह शेतातून वळल्याने, अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून गेली. अनेकांचे ठिबक संच, इलेक्ट्रीक मोटारी वाहून गेल्या. नदीकाठावरील काही विहिरी मध्ये पुराचे पाणी शिरल्याने गाळ जमा होऊन विहिरी सपाट झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गावाजवळील शेतकरी कडूबा भिकन होळेकर यांच्या शेतातील आल्याचे पीक, कपाशी मुळासह वाहून गेले. तसेच ठिबक संचही वाहून गेल्याने दीड लाखाचे नुकसान झाले आहे. तसेच वसंत पुंडलिक महालपुरे यांच्या शेतातून बामणी नदीचा वळसा वळल्याने सहा ते सात एकर कपाशी व दोन एकर सोयाबीनचे पीक वाहून गेले आहे.जवळपास ४० ते ५० शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाल्याने ५० ते ५५ लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बामणी नदीचा पुराचा वळसा महालपुरे यांच्या शेतातून थेट दगडी नदीत उतरल्याने, दगडी नदीने आक्राळ-विक्राळ रूप धारण करून, सातगाव डोंगरी गावाच्या तडवी वस्तीच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने एकच हाहाकार उडाला होता. अनेकांची भांडीकुंडी वाहून गेलेल्या भागाचीही आमदार व सदर टीमने पाहणी केली. यावेळी आमदार किशोर पाटील म्हणाले की, प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा शेताचा पंचनामा होणार आणि जी काही शासनाची तरतूद आहे. त्यानुसार मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी घोसला तालुका सोयगाव येथील समाजसेवक सोपान पुंडलिक पाटील यांनीही आमदार किशोर पाटील यांची भेट घेऊन, सोयगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा करण्यासाठी सोयगावचे कोणतेच अधिकारी आज आलेले नाहीत. अशी खंतही त्यांनी आमदार किशोर पाटील यांच्याकडे मांडली.
यावेळी सातगावचे सरपंच पती राजेंद्र बोरसे, ज्ञानेश्वर चौधरी, प्रदीप महालपूरे, मंडळ अधिकारी अनिल पाटील, ज्ञानेश्वर अहिरे, शंकर पवार, ज्ञानेश्‍वर रामदास पाटील, प्रल्हाद वाघ, हिम्मत मनगटे, सागर गायकवाड, समाधान पाटील, बहादुर पाटील, कृषी सहाय्यक सुनील वारे, तलाठी रूपाली रायगडे, ग्रामसेवक के.डी.पवार, कोतवाल उमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.Required fields are marked *