प्रशासकीयब्रेकिंग न्युज

शालेय शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी ‘निष्ठा’ ॲप राष्ट्राला समर्पित

केन्द्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांची माहिती

अकोला,दि.16(जिमाका)- इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शासकीय शाळेतील शालेय शिक्षकांच्या समग्र प्रगतीसाठी ‘निष्ठा’ या ॲप व वेब पोर्टलद्वारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालयाने देशात पुढाकार घेतला आहे अशी माहिती केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली. आज मानव संसाधन विकास मंत्रालयातर्फे ‘निष्ठा’ या ॲप व वेब पोर्टलचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर माहिती देताना ना. धोत्रे बोलत होते.

श्री. धोत्रे म्हणाले, ‘निष्ठा’ हा मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या समग्र शिक्षा अभियानाच्या अंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम आहे. ‘निष्ठा’द्वारे 42 लाख शालेय शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत 33 राज्य  व केंद्रशासित प्रदेशातील 17 लाख 50 हजार शिक्षकांना ऑफलाईन प्रशिक्षण मागील ऑगस्ट 2019  ते मार्च 2020 पर्यंत देण्यात आले आहे. आता वेब पोर्टल व ॲपव्दारे 25 लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 23 हजार प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात येईल.  

एनसीईआरटी, कैवल्य, अरविंदो सोसायटी, अजीज प्रेमजी, टाटा ट्रस्ट यांच्या मदतीने ‘निष्ठा’ पोर्टल तयार करण्यात आले. तसेच यामध्ये राज्य शासन, केन्द्रीय विद्यालय, नवोदय विद्यालय यांचासुद्धा सक्रिय सहभाग होता. हे प्रशिक्षण ‘निष्ठा’ पोर्टल, डीटीएच, स्वयंप्रभा चॅनेल, दीक्षा प्लॅटफॉर्म याव्दारे उपलब्ध होईल. या मुळे देशातील शिक्षक प्रशिक्षित होऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. यामुळे शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास  होण्यास मदत होईल, असा आशावाद ना. धोत्रे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button