मुंबई दि.३०:आठवडा विशेष टीम― सबका साथ सबका विकास ही घोषणा देत पहिला 5 वर्षांचा कार्यकाळ यशस्वी केल्यानंतर दुसऱ्यंदा अभूतपूर्व बहुमताने पुन्हा मोदी सरकार निवडून आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास मिळवून काम करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार मोदी सरकारने दुसऱ्या टर्मच्या पहिल्याच वर्षात विविध निर्णय घेत ऐतिहासिक कामगिरी करीत सर्व समाज घटकांचा अतूट विश्वास जिंकण्यात यश मिळविले आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.
स्वातंत्र्यानंतर च्या काळात कोरोना महामारी ही देशातील सर्वात मोठे संकट ठरले आहे. या संकटाविरुद्ध लढण्यासाठी भारत सरकार ने योग्य वेळी लॉकडाऊन चा निर्णय घेऊन कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवल्याबद्दल संपूर्ण जगात भारत सरकारचा गौरव होत आहे आहे या अभिमानास्पद कामगिरीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आपण अभिनंदन करीत असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले. कोरोना महामारीचा फटका संपूर्ण जगाला पडला असून आर्थिक औद्योगिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यातून उभे राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रथम गरीब मजुरांसाठी 1लाख 72 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले त्यानंतर 20 लाख कोटींचे आत्मनिर्भर भारत अभियान चे महापॅकेज जाहीर करून देशवासियांना मोठा आधार दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या
नेतृत्वातील एनडीए सरकारने आपल्या दुसर्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात दलित, मागासवर्गीय , अल्पसंख्यांक, गरीब, शेतकरी, कामगार, महिला या सर्व घटकांच्या कल्याणासाठी ऐतिहासिक कामे केली आहेत.
जम्मू काश्मीर ची घटना वेगळी असल्याने तिथे अन्य राज्यातील उद्योजकांना उद्योग उभारण्यास परवानगी नव्हती.त्यामुळे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय जम्मू काश्मीर चा विकास होण्यास ऐतिहासिक निर्णय ठरला आहे. मुस्लिम महिलांना न्याय देण्यासाठी तीन तलाक रद्द करणारा कायदा मंजूर केला. 1989 मध्ये मंडल आयोगामुळे राष्ट्रीय ओबीसी आयोगाची स्थापना झाली त्यानंतर 30 वर्षापर्यंत कोणत्याही सरकारने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला नव्हता मात्र मोदी सरकारने ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. दिव्यांगजनांना नोकरी मध्ये 4 टक्के आरक्षण आणि शिक्षणामध्ये 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. दिव्यांगजनांसाठी सुगम्य भारत योजना राबवून 15 लाख पेक्षा अधिक दिव्यांगजनांना मोफत सहाय्यक उपकरणे देण्यात आली आहेत. दिव्यांगजन कल्याण महामंडळ दिव्यांगजणांच्या विकासासाठी कार्यरत आहेत.
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. लवकरच आपल्या सर्व देशवासियांच्या सहकार्याने कोरोना महामारीला नष्ट करण्यात केंद्र सरकार यशस्वी होईल.असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.
मागील वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारने सर्व समाज घटकांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या आहेत. जन धन योजना, उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान निधी या इतर प्रमुख योजनांच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या रांगेत उभे असलेल्या व्यक्तींचे कल्याण केले गेले आहे. असे ना.रामदास आठवले म्हणाले.
मोदी सरकार च्या दुसऱ्या टर्म च्या पहिल्या वर्षाच्या कार्यकाळात सर्जिकल स्ट्राइकद्वारे दहशतवाद रोखण्यास मोठी मदत झाली आहे, दिव्यांग, दलित व मागासवर्गीयांच्या कल्याणासाठीही विशेष कायदे बनविण्यात आले. सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयामार्फत मागासवर्गीय, दलित आणि दिव्यांग लोकांच्या कल्याणासाठी असलेल्या प्रमुख योजनांसह सर्व पात्रांना 100 टक्के लाभ मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
केंद्र सरकार देशातील जनतेच्या आशा व आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. आगामी काळात देशाला सर्व क्षेत्रात ऐतिहासिक यश मिळेल असे सांगत ना. रामदास आठवले यांनी रिपाइं च्या देशभरातील लाखो कार्यकर्त्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.