चंद्रपूर दि.०१:आठवडा विशेष टीम―चंद्रपूर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या खाणींमुळे झालेल्या गावांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात पाच वर्ष प्रश्न रेंगाळत राहणे योग्य नाही. आज दोन्ही बाजू ऐकून घेतल्या असून गावकऱ्यांनी त्यांच्या गावातील पुनर्वसित घरांच्या संख्या याबाबतचा अंतिम प्रस्ताव पुढील आठ दिवसांत सादर करावा. त्यानंतर या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज येथे दिले.
पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबतचे भिजत घोंगडे आणखी किती काळ आपण सुरू ठेवणार आहात. त्यामुळे वेकोली व गावकरी यांच्यातील कोंडी सोडण्यासाठी प्रशासनाने पुढच्या आठ दिवसात अंतिम निर्णय घ्यावा, असे स्पष्ट निर्देश आजच्या बैठकीत पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी दिले. या बैठकीला खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर ,आ. किशोर जोरगेवार, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड चंद्रपुर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभास चंद्रसिंग, बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक एस.सी.डे, वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक उदय कावळे, माजरी क्षेत्राचे महाप्रबंधक प्रचालन बी.एन.शर्मा तसेच अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मौजा मसाळा तुकुम, मौजा भटाळी, आदी गावातील पुनर्वसनाचा प्रश्न चर्चिला गेला.मूळ रहिवाशांवर अन्याय व्हायला नको. सोबतच गावातील रहिवाशांची संख्या अधिक कशी झाली याचे स्पष्टीकरण सुद्धा प्रस्तावात असावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. घरांच्या पुनर्वसनाचा सोबतच शेताच्या संदर्भात निर्णय घेताना समूहाबाबतचा दृष्टिकोण वेकोलीने समोर ठेवावा. काही एकरांचे हस्तांतरण व काही एकरांवर मालकी अशी परिस्थिती ठेवू नये अशी सूचना त्यांनी यावेळी केली. या बैठकीला अधिकाऱ्यांसोबतच दोन्ही गावचे गावकरीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.या गावकऱ्यांचे म्हणणेदेखील यावेळी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी ऐकून घेतले.
या बैठकीनंतर अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी वेकोलीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक कामगारांची भरती करण्यात यावी. स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळावा, अशी मागणी केली.