ना. पंकजाताई मुंडेंच्या भाषणाने महिलांमध्ये संचारला उत्साह ; भोसरीत इंद्रायणी थडी जत्रेचे शानदार उदघाटन
आठवडा विशेष|प्रतिनिधी
पुणे दि. ०८: महिलांमध्ये असलेली बचतीची खरी ताकद ओळखून सरकारने विविध योजनांद्वारे प्रोत्साहन दिल्यामुळेच बचतगटांची उलाढाल आज दहा कोटींवर पोहोचली असून २६ जिल्हयांमध्ये याचा विस्तार झाला आहे. महाराष्ट्रातील बचतगटांची ही चळवळ देशात प्रभावी ठरली असून ती भविष्यात आणखी व्यापक होईल असा विश्वास राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी येथे व्यक्त केला.
आमदार महेश लांडगे व पूजा लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरी येथे आजपासून चार दिवस चालणा-या इंद्रायणी थडी जत्रेचे शानदार उदघाटन ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज झाले त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामीण भागातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या आकर्षक वस्तूंचे विविध स्टाॅल हे यात्रेचे खास वैशिष्ट्य होते. आ. लक्ष्मण जगताप, महापौर राहूल जाधव, पुणे प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी ना पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या जोशपुर्ण भाषणाने उपस्थित महिलांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, महिलांचा स्वभाव मुळातच बचतीकडे झुकलेला असतो. तिने केलेली बचत ही तिच्या कुटुंबाला संकटकाळी मदतीला येते. कर्जमुक्ती आणि कर्जमाफीसाठी एकीकडे ज्यावेळी मोर्चे निघत होते त्यावेळी दुसरीकडे बचतगटांच्या महिला घेतलेलं कर्ज शंभर टक्के परतफेड करत होत्या. हे वास्तव आणि ती ताकद ओळखून सरकारने महिलांच्या बचतीला न्याय देण्याचे धोरण आखले. बचतगटांना शुन्य टक्के दराने कर्ज देण्याची योजना अंमलात आणल्यानंतर बचतगटांची चळवळ अधिक वाढली.मागच्या सरकारच्या काळात ८ जिल्हयांमध्ये असणारी ही चळवळ आज २६ जिल्ह्यात पोहोचली आणि उलाढाल ५० लाखावरून १० कोटी पर्यंत गेली, हेच या योजनेच्या यशाचे गमक आहे असे त्या म्हणाल्या.
एक महिला म्हणून काम करताना समाजातील सर्व वंचित पिडित घटकांचा विकास झाला पाहिजे हिच आपली भूमिका राहिली आहे. लोकनेते मुंडे साहेबांचे तसे संस्कार माझ्यावर आहेत. महिलांच्या समर्पणाची कदर केली गेली पाहिजे असे सांगून मुंडे साहेबांनी सर्व सामान्य माणसाच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले होते ते विविध योजना अंमलात आणून पुर्ण करण्याचा मी प्रयत्न करते आहे असे त्या म्हणाल्या.
दलालांची फौज संपवली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य माणसांपर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्याचे चांगले काम केले आहे. काॅग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने जनतेसाठी काहीच केलं नाही. त्यामुळे आम्हाला आता शौचालयं बांधावे लागत आहेत. गरीबांना गॅस, बेघरांना घरं, सौभाग्य योजनेतून वीज आम्ही देत आहोत. वर्षानुवर्षे गरीबांपर्यंत काहीच पोहचत नव्हते, म्हणून सरकारने दलालांची फौज नष्ट करून योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या. विरोधक केवळ खोटारडे राजकारण करून जनतेची दिशाभूल करीत आहेत असे त्या म्हणाल्या.
बैलगाडीतून काढली मिरवणूक
याप्रसंगी ना. पंकजाताई मुंडे यांचे जंगी स्वागत करण्यात आले. बैलगाडीतून कार्यक्रम स्थळापर्यंत त्यांची बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या यात्रेतील ग्राम संस्कृती मधील बारा बलुतेदार यांचे देखावे व त्यांनी तयार केलेल्या वस्तू जेवणाला खमंग चव येण्यासाठी व त्यावर मसाले वाटण्यासाठी पाटा- वरवंटा, घोंगडी, कुंभाराने तयार केलेली मडकी पाहून त्यांनाही स्वतः मडके बनवण्याचा मोह आवरता आला नाही. कार्यक्रमास महिलांनी मोठी गर्दी केली होती.