‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन

नाशिक दि.३:आठवडा विशेष टीम― हवामान विभागाच्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळ ३ जून किंवा ४ जून रोजी नाशिक जिल्ह्यात येण्याची शक्यता असून जिल्ह्यातील काही भागात नागरिकांना अतिवृष्टी, गारपीट व वादळाचा फटका बसू शकतो. त्यामुळे नाशिक शहर व जिल्ह्यातील नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेसाठी दोन दिवस घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ हे आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव किशोरराजे निंबाळकर, संचालक डॉ. अभय यावलकर, नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह यांच्या संपर्कात असून यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेण्यात येत असून योग्य त्या उपाययोजना करण्यातबाबत सूचना दिलेल्या आहे.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, आयएमडी हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार निसर्ग चक्रीवादळ ३ जून किंवा ४ जून रोजी नाशिक जिल्ह्यात दाखल होऊन यामुळे जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी, गारपीट व वादळाचा फटका बसू शकतो. त्यामुळे या काळात नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर अतिवृष्टीमुळे नागरिकांनी घरातच सुरक्षित रहावे, घराच्या बाहेर पडू नये. घर नादुरुस्त असल्यास किंवा पत्र्याचे असेल तर तात्काळ दुरुस्ती करावी व सुरक्षित स्थळी आवश्यक साधनसामुग्री सोबत घेवून स्थलांतरीत व्हावे, घराच्या भोवती वादळामुळे विजेचे खांब किंवा तारा, झाडे इ. पडण्याची शक्यता असल्यास अशा वस्तुंपासुन लांब रहावे. शेतकऱ्यांनी आपले पशुधन व अन्य पाळीव प्राणी यांना अगोदरच सुरक्षित स्थळी हलवावे किंवा आपल्या सोबत सुरक्षित करावे असे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांनी घरात प्रथमोपचार किट, लागणारी आवश्यक औषधे व आजारी रुग्णांची औषधे सुरक्षित जवळ ठेवावी. विद्युत वाहक तारा तुटल्याने व ट्रान्सफार्मर खराब झाल्यास पर्यायी व्यवस्था करावी. जनरेटरसाठी इंधनाचा पुरवठा असावा. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. विनाकारण घराबाहेर न पडता व कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सद्यस्थितीत जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होम क्वारंटाईन असलेले नागरिक यांच्यासाठी सुरक्षित स्थळे निश्चित करावी व चक्रीवादळाचे पार्श्वभुमीवर त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याबाबत नियोजन करावे तसेच अधिक माहितीसाठी व आवश्यक मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक संपर्क क्रमांक 0253-2317151 व 2315080 येथे संपर्क करावा, असे आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.