शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही याची तक्रार आली नाही पाहिजे―उद्धव ठाकरे

राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचविण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना

मुंबई दि ८:आठवडा विशेष टीम― खरीप हंगामामध्ये बियाण्याचा तुटवडा पडू देऊ नका, बोगस बियाण्यांच्या प्रकारांमध्ये कडक शिक्षा होईल हे पहा तसेच कोणत्याही परिस्थितीत विशेषत: राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पिक कर्ज मिळण्यासाठी बँकांच्या शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा अशा सूचना देऊन शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
कृषि खरीप हंगाम कामांचा आढावा व बी बियाणे, खते, किटकनाशके, पिक कर्ज वाटप, कापूस, तुर व धान खरेदीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील सहभागी झाले होते. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, सचिव कृषि एकनाथ डवले, प्रधान सचिव सहकार आभा शुक्ला, प्रधान सचिव पदुम व पणन अनुप कुमार, सचिव, अन्न व नागरी पुरवठा संजय खंदारे, व्यवस्थापकीय संचालक, कापूस उत्पादक महासंघ नवीन सोना,आयुक्त कृषि सुहास दिवसे, व्ववस्थापकीय संचालक, महाबीज उपस्थित होते

यावेळी माहिती देण्यात आली की, खरीप हंगामासाठी ४३.५० लाख मेट्रिक टन इतकी मागणी केंद्राकडे नोंदवली होती त्यापैकी ४० लाख मेट्रिक टन पुरवठ्यास मंजुरी आली आहे. याशिवाय ५० हजार मेट्रिक टन युरियाचा संरक्षित साठा करण्यात येत आहे.

५ लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना बांधावर बियाणे

खते व बी बियाणे बांधावर पुरविण्यासाठी ४७ हजार ८९ शेतकरी गट तयार करण्यात आले असून १ लाख ५५ हजार ७५५ मेट्रिक टन खत, ८६ हजार १२६ मेट्रिक टन बियाणे , १ लाख ८० हजार ४८१ कापूस बियाणे पाकिटे बांधावर देण्यात आली आहेत. एकूण ५ लाख २७ हजार ४८३ शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

कापूस, तूर खरेदी

एकंदर ३८१ लक्ष क्विंटल कापूस खरेदी झाली असून ९ लाख क्विंटल खरेदी राहिली आहे. १८.८१ लाख क्विंटल तूर खरेदी झाली असून २ लाख शेतकऱ्यांकडून तूर खरेदी करण्यात आली आहे. ८२२ कोटी रुपयांचे चुकारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. १८.९० लाख क्विंटल चणा खरेदी झाली असून १५ जुलैपर्यंत मुदतवाढ मागण्यात आली आहे. याचेही चुकारे लवकरच शेतकऱ्यांना देण्यात येतील.

पिक कर्ज वाटपाला गती द्यावी

यावेळी बोलताना कृषी मंत्री दादा भुसे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की पिक कर्ज वाटपाला अधिकाधिक गती देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या असून बँकांच्या संपर्कात अधिकारी आहेत. यावेळी प्रधान सचिव आभा शुक्ला यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून एकूण ४६ टक्के तर राष्ट्रीयकृत बँकांकडून ७ टक्के पिक कर्ज वाटप झाल्याची माहिती दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी ६२५० कोटी तर राष्ट्रीयकृत बँकांनी २३०० कोटी रुपये पिक कर्ज वाटप केल्याचे त्या म्हणाल्या. बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचा २२ मेचा शासन निर्णय पोहोचविणे सुरू असून शेतकऱ्यांना पिक कर्जात अडथळा येऊ नये अशा सूचना दिल्याचेही त्या म्हणाल्या .

निसर्ग चक्रीवादळ शेतीचे नुकसान

निसर्ग चक्रीवादळामुळे रत्नागिरी आणि रायगड येथे ४६५० हेक्टर जमीन आणि १८ हजार हेक्टर फळपिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहितीही देण्यात आली.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.