अहमदनगर, दि.१०:आठवडा विशेष टीम― मुंबईहून श्रीगोंदा तालुक्यातील कोंडेगाव येथे आलेल्या 85 वर्षीय आजीबाईंना कोरोनाने घेरले. सोबतीला इतर आजारही होतेच. मात्र, मनाचा कणखरपणा, उपचारांना योग्य प्रतिसाद आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर या आजीबाई आज कोरोनातून बर्या होऊन घरी परतल्या आहेत. येथील बूथ हॉस्पिटल मधून त्यांना वैद्यकीय तपासणी नंतर आज डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी हॉस्पिटल मधील डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौतुक करत त्यांना निरोप दिला आणि चांगल्या आरोग्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
या आजीबाई मुंबई येथून 1 जून रोजी गावी आल्या होत्या. त्यांना त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मधुमेह आणि इतर आजारांचाही त्रास होत असल्याने सुरुवातीचे तीन-चार दिवस त्यांना आयसीयु मध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना बूथ हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. या उपचारांना आजीबाईंनी चांगला प्रतिसाद दिला आणि ठणठणीत बरे होऊन तिथून त्या बाहेर पडल्या.
कोरोनातून बरे होऊन त्यांनी या आजाराला आपण हरवू शकतो, असा आत्मविश्वास इतरांमध्ये ही निर्माण केला आहे. लक्षणे जाणवल्यास तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेतले पाहिजेत हा आजार लपवून न ठेवता त्यावर योग्य वेळी उपचार घेतले पाहिजेत. त्यामुळे रुग्ण त्यातून बरा होऊ शकतो हाच संदेश आजीबाईंनी इतरांनाही दिला आहे त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यां बद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.