सोयगाव,दि.७:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
पळसखेडा ता.सोयगाव येथे सकारात्मक रुग्णाच्या संपर्कातील घेण्यात आलेल्या ९ स्वॅब पैकी दोघांचा मंगळवारी सकारात्मक अहवाल आल्याने पळसखेडा येथे रुग्णांची संख्या तीनवर पोहचली असून सोयगाव तालुक्यात कोरोना संसर्गाची रुग्णसंख्या सहावर गेली असल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.सकारात्मक अहवाल येताच तालुका आरोग्य विभागाच्या पथकाकडून पुन्हा कंटेनमेंट झोन मध्ये स्क्रीनिंग करण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती.
पळसखेडा ता.सोयगाव येथे जळगावच्या खासगी रुग्णालयात जाणाऱ्या एकाला सकारात्मक असल्याचा अहवाल प्राप्त होताच तालुका आरोग्य विभ्गाकडून गावात त्या रुग्णाच्या संपर्कातील ९ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आल्यावर मंगळवारी एक २८ वर्षीय महिला आणि सहा वर्षीय मुलाला सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्याने तालुका आरोग्य विभाग धावपळ उडाली होती.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.श्रीनिवास सोनवणे,तहसीलदार प्रवीण पांडे,नायब तहसीलदार शेख मकसूद,आदींनी गावात पुनः भेटी देवून सूचना दिल्या आहे.
लक्षणे नसतांनाही सकारात्मक ,आरोग्य विभागात आश्चर्य
सकारात्मक रुग्णाच्या संपर्कातील ९ जणांचे स्वॅब घेण्यात आल्यानंतर त्याना लक्षणेच आढळली नव्हती परंतु लक्षणे नसतांना दोन रुग्ण सकारात्मक आढळल्याने तालुका प्रशासनासह आरोग्य विभागातही आश्चर्य व्यक्त होत आहे.
दोघांना जळगावला रवाना-
सकारात्मक अहवाल प्राप्त झालेल्या दोघा नवीन रुग्णांना जळगावला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले असून गावात त्या दोघांच्या संपर्कातील असलेल्यांचे शोध घेण्यात येत आहे.या दोघांचा सकारात्मक अहवाल प्राप्त होताच गावातील कंटेनमेंट झोन मधील ग्रामस्थांचे स्क्रीनिंग करून तपासणीची मोहीम हाती घेण्यात आली होती.