आष्टी:आठवडा विशेष टीम― यंदा पावसाळ्याच्या प्रारंभीच चांगला पाऊस झाल्याने मुग , उडीदाचे पिक चांगले आले आहे परंतु व्यापारीवर्ग शेतकऱ्यांकडून कमी किमतीत उडीद ,मुगाची खरेदी करुन शेतकऱ्यांची अर्थिक लुट करीत आहेत.शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या उडीद, मूग आणि नंतर येणाऱ्या तुरीला शासनाचा हमी भाव मिळावा यासाठी शासनाने हमी भाव खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा भीमराव धोंडे यांनी केली आहे.
प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सध्या शेतकरी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उडीद , मूग विक्रीसाठी आणत आहेत परंतु व्यापारी वर्गाकडून हमी भावापेक्षा एक हजारांहुन अधिक कमी भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करीत आहेत.शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसत आहे.शासनाने फेडरेशनसाठी अद्यापपर्यंत परवानगी दिलेली नाही. ही परवानगी तात्काळ देऊन फेडरेशन सुरू करावे.अनेक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे अशा अनेक तक्रारी आहेत.शेतकऱ्यांनी व्यापाऱ्याला माल विकल्यावर त्याची रीतसर पावती घ्यावी.कृषि उत्पन्न बाजार समिती आवारातील जे व्यापारी शेतकऱ्यांचा कमी भावात माल घेत असतील असे निदर्शनात आल्यास संबंधित व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी अशीही मागणी अजयदादा धोंडे यांनी निवेदनाव्दारे केली आहे