कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्यात सर्वात जास्त कॉन्टॅक्ट ट्रेसिंग रेट बीड जिल्ह्यात २४ टक्केे – आरोग्य मंत्री राजेश टोपे

कोरोना लढ्यात जिल्ह्याच्या आरोग्यसुविधांमध्ये तडजोड होणार नाही, निधीही कमी पडू देणार नाही – पालकमंत्री धनंजय मुंडे

१००० खाटांचे कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयाचे झाले लोकार्पण

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन संपन्न

बीड दि.३१ :आठवडा विशेष टीम― जिल्ह्यातील कोविड विरुद्धच्या लढ्यात अत्यंत कमी वेळेत उभारण्यात आलेल्या या कोविड रुग्णालयामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम झाली असून रुग्णांना योग्य व वेळेत उपचार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत मिळणार आहे. आरोग्य विभागाकडून, जिल्हा नियोजन समितीतुन, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून असा सर्व प्रकारांमधून निधी उपलब्ध केला आहे व पुढेही आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देऊ. कोरोना लढ्यात जिल्ह्यातील आरोग्य सुविधांमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही; असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.

अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे आज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते ऑनलाईन आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड रुग्णालयाचे उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवकन्या शिरसाट, आमदार प्रकाश सोळंके, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, आरोग्य उपसंचालक डॉ.माले, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मिसकर, श्री सचिन मुळीक, श्री राजकिशोर मोदी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ आर बी पवार, लोखंडी सावरगावचे सरपंच राजपाल देशमुख आदी उपस्थित होते.

बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे काम सक्षमतेने -आरोग्य मंत्री राजेश टोपे

बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षमतेने काम करीत असून कोविड रुग्णांचा संपर्क शोध (कॉन्टॅक्ट रेसिंग रेट) २४ टक्के असून हा राज्यात सर्वात चांगला असून याच बरोबर जिल्ह्यातील रुग्ण बाधित होण्याचे प्रमाण (पॉझिटिव्हिटी रेट )राज्यात इतर जिल्ह्यापेक्षा कमी ७.१२ टक्के आहे. आज उद्घाटन झालेल्या या रुग्णालयाच्या निर्मितीने कोविडविरुद्धच्या लढ्याला बळ मिळणार असून आरोग्य सुविधांमध्ये हे रुग्णालय मैलाचा दगड ठरणार असल्याचे मत यावेळी बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

जिल्ह्यातील आरोग्य उपाययोजनांसाठी आणखी ३५ कोटी रुपये निधी प्रस्तावित

पालकमंत्री श्री मुंडे यांनी यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी ऑनलाईन संवाद साधत जिल्ह्यातील आरोग्य उपाययोजनांसाठी आणखी ३५ कोटी रुपये निधी अपेक्षित असून तो तातडीने मंजूर करण्यात यावा, याबाबत विनंती केली. तसेच माजलगाव येथे उपजिल्हा रुग्णालय निर्मिती, जिल्हा रुग्णालयात २०० खाटा वाढवणे यांसह जिल्ह्यातील अन्य उपाययोजनांबतही मागणी केली.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ३५ कोटी रुपये निधी मंजूर करण्याबाबत तसेच जिल्ह्यातील अन्य सर्वच मागण्यांबाबत आरोग्य विभाग सकारात्मक असून लवकरच निधी उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वस्त केले.

पालकमंत्री श्री मुंडे यांनी अत्यंत कमी वेळेत हे रुग्णालय उभे करण्यासाठी काम केलेल्या सर्व घटकांचे व प्रशासकीय यंत्रणांचे कौतुक करत जिल्हावासीयांच्या वतीने आभार मानले.

संपूर्ण रुग्णालयाचा घेतला आढावा

कोनशीला लोकार्पण झाल्यानंतर ना. धनंजय मुंडे यांनी रुग्णालयातील विविध वॉर्डांना भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. यावेळी ऑक्सिजन उपलब्धता, व्हेंटिलेटर्स, स्वच्छता, मनुष्यबळ, उपचार पद्धती, उपलब्ध साधनसामग्री व औषधसाठा यासह सर्व बाबींची माहिती घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आवश्यक सूचना केल्या.

अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील रुग्णालयात १००० खाटांचे असून या रुग्णालयात एक हजार खाटापैकी २५० खाटांचे कोवीड केअर सेंटर असेल, २५० खाटांचे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल असेल; २५० खाटापैकी २०० खाटावर ऑक्सिजनची व्यवस्था असेल. तसेच उर्वरित ५०० खाटांचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर असेल यामध्ये ३०० खाटांना ऑक्सिजनची सुविधा आहे.

जिल्ह्यात वाढत्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अत्यंत कमी वेळेत बळ मिळवून दिले आहे. व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्स, अँटिजेन रॅपिड टेस्टिंग यासह विविध सुविधांसाठी कोट्यावधी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे.


Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.