#CoronaVirus अकोला: कैद्यांच्या उपचाराची व्यवस्था कारागृहातच

अकोला,दि.२८:आठवडा विशेष टीम― जिल्हा कारागृहातील कोरोना बाधीत कैद्यांवर उपचारांची व्यवस्था कारागृहातच करण्यात आली आहे. यासंदर्भात आज निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत माहिती देण्यात आली. याउपचारासाठी जिल्हा कारागृहातील बॅरेक क्रमांक पाच हे कोविड केअर सेंटर म्हणून घोषित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या दालनात आयोजित या तातडीच्या बैठकीस जिल्हा कारागृहाचे प्रभारी अधिक्षक सुभाष निर्मळ, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, कारागृहासाठी नेमण्यात आलेले स्वतंत्र वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित जोशी, डॉ. श्यामकुमार शिरसाम हे उपस्थित होते.

आजअखेर जिल्हा कारागृहातील ६८ कैद्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या सर्व कैद्यांची व्यवस्था अन्य कैद्यांपासून वेगळी व कोविड संदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार करण्यात आली आहे, अशी माहिती अधिक्षक निर्मळ यांनी दिली. या कैद्यांवर कोविड संदर्भात करावयाच्या उपचारांसाठी कारागृहातच बॅरेक क्रमांक पाच मध्ये कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले आहे. त्यांच्या आवश्यक सर्व वैद्यकीय चाचण्यांची व्यवस्थाही तेथेच करण्यात येणार आहे. त्यात त्यांचे तापमान मोजणे, ऑक्सिजन पातळी मोजणे, एक्स रे काढणे, ईसीजी काढणे इ. सर्व व्यवस्था कारागृहात पोर्टेबल संयंत्र नेऊन केली जात आहे. दिवसातून करावयाच्या नियमित तपासण्या व अन्य उपचारांसाठी स्वतंत्र वैद्यकीय पथक नेमण्यात आले आहे. या सर्व कैद्यांच्या उपचाराच्या सर्व वैद्यकीय प्रक्रिया नियमित पार पाडाव्यात, अशा सुचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिल्या. कैद्यांच्या वैद्यकीय तपासण्या व उपचाराची व्यवस्था शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोपचार रुग्णालय येथून केली जात आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.