MahaJobs :‘महाजॉब्स’ पोर्टलवर अवघ्या चार तासात १३ हजार नोकरी इच्छुकांची तर १४७ उद्योगांचीही नोंदणी | Maharashtra Government Job Portal

मुंबई दि.०६:आठवडा विशेष टीम― मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लोकार्पण केलेल्या “महाजॉब्स” या संकेतस्थळावर अवघ्या चार तासातच सुमारे १३ हजार ३०० पेक्षा अधिक नोकरी इच्छुकांनी तर १४७ उद्योजकांनी नोकरभरतीसाठी आपली नोंदणी केली.
राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबर उद्योजकांनाही कुशल आणि अकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. याला लोकार्पणाच्या पहिल्याच चार तासात मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. संकेतस्थळाचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा मुख्य उद्देश पूर्ण करण्याबरोबच राज्यातील उद्योगांची चाके पुन्हा त्याच गतीने धावण्यास मदत होणार आहे. http://mahajobs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तरूणांना आणि उद्योजकांना नोंदणी करता येणार आहे.

कोरोना महामारीमुळे राज्यात लागू झालेली टाळेबंदी टप्प्याटप्प्याने उठविली जात असून ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत अनेक सवलती देण्यात येत आहेत. राज्यातील उद्योग सुरू व्हावेत यासाठी परवानग्या देण्यात आल्या असून हजारो उद्योग सुरू झाले आहे. एका बाजूला तरूणांना काम नाही आणि दुसऱ्या बाजूला उद्योजकांना मनुष्यबळ नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाच्या उद्योग विभागाच्यावतीने हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून त्याचा फायदा हजारो तरूणांना आणि उद्योजकांना होणार आहे.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.