प्रशासकीयब्रेकिंग न्युज

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ‘क्रीडा महाकुंभ’ स्पर्धेचे आयोजन

आठवडा विशेष टीम―

मुंबई दि.2 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीचे औचित्य साधत पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देण्याचे उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ‘ क्रीडा महाकुंभ स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. येत्या 2 ते 9 मार्चपर्यंत हा क्रीडा महाकुंभ राज्यात सुरू राहणार आहे.

या क्रीडा महाकुंभात कब्बडी आणि खो-खो या जागतिक दर्जाच्या खेळांबरोबर लगोरी, लेझिम, लंगडी, विटी दांडू यांसह 12 पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. 2 आणि 3 मार्च रोजी आय टी आय स्तरावर, 4 आणि 5 मार्च रोजी जिल्हास्तरावर तर 7 ते 9 मार्च पर्यंत नाशिक विभागीय स्तरावर या क्रीडा कुंभाची सांगता होईल. विजेत्यांना आकर्षक पारितोषिक तर सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी एक क्यूआर कोड स्कॅन करावा लागणार आहे. तसेच इच्छुक खेळाडूंनी क्रीडा कुंभसाठी नियुक्त केलेले प्रभारी किंवा संबंधित आय.टी.आयच्या मुख्याध्यापकांकडे नोंदणी करायची आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाममात्र 10 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात आले असून ते रिफंड अर्थात पुन्हा स्पर्धकांना परत देण्यात येणार आहे.

गुंफुनी स्वदेशी खेळाची माळ…जोडूया भारतीय संस्कृतीशी नाळ हे ब्रीद वाक्य घेऊन मंत्री श्री.लोढा यांच्या पुढाकाराने या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तन आणि मन जोडून जागतिक स्तरावर दर्जेदार खेळाडू घडवण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 साली देशभरात ‘खेलो  इंडिया’ ही संकल्पना राबवली. या संकल्पनेच्या आधारावर आखिल  भारतीय विद्यार्थी परिषदेने देशभरात ‘खेलो भारत’  ही क्रीडा मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत आता कौशल्य विकास, रोजगार आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महाराष्ट्राच्या मातीत खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक खेळांना पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. महाराष्ट्राची थोर सांस्कृतिक परंपरा आहे. इथल्या मातीतल्या खेळातूनही या मराठी संस्कृतीचे दर्शन होते. त्याचबरोबर शिवकालीन इतिहास खेळाच्या माध्यमाने नव्या पिढीला कळावा यासाठी पावनखिंड दौड या खेळाचा समावेशही या स्पर्धेत करण्यात आला आहे.

या क्रीडा महाकुंभात दंड बैठक, लेझिम, पंजा लढवणे, रस्सी खेच, लंगडी, दोरीवरच्या उड्या, कब्बडी, फुगडी, खो-खो, विटी दांडू आणि लगोरी या पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे. महिला आणि पुरुष दोन्ही गटात या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.

कौशल्य विकास विभागांतर्गत येणारे व्यवसाय प्रशिक्षण आणि संचालनालय आणि पुणे येथील क्रीडा भारती या संस्थेच्या सहयोगाने या क्रीडा महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त तरुण तरुणींनी सहभाग घेऊन महाराष्ट्रातील पारंपरिक खेळांना आणखी दर्जेदार करून आपली मराठी संस्कृती जपावी आणि हे खेळ जागतिक स्तरावर पोहचवावे असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Back to top button