रायगड किल्ल्यावरील विद्युतीकरणासाठी ६ कोटींचा निधी; भूमिगत वीज वाहिन्यांमुळे रायगडाच्या सौंदर्यावर परिणाम नाही – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांची विधानसभेत माहिती

आठवडा विशेष टीम―

मुंबई, दि.21 : शिवछत्रपतींची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचा विकास व किल्ल्यावरील जुन्या व जीर्ण विद्युत वाहिन्या बदलून वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण व नूतनीकरण करण्यासाठी शिवजयंतीच्या निमित्ताने रायगड जिल्हा नियोजन समितीमार्फत रु. 6.04 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे, असे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी विधानसभेत सांगितले.

ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, या कामाचा कार्यादेश दिनांक 5 मार्च 2020 रोजी देण्यात आला. रायगड किल्ल्याला सद्यस्थितीत 22 केव्ही कलोशे उपकेंद्रामार्फत 22 केव्ही पाचाड वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. रायगड किल्ला कलोशे उपकेंद्रापासून 15 किलो मीटर आहे. रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची अंदाजे 2850 फूट इतकी आहे. वीज कर्मचारी व कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अवघड भौगोलिक परिस्थितीचा सामना करुन आवश्यक भूमिगत केबल (वजन अंदाजे 515 किलो) व 4 वितरण रोहित्र (वजन अंदाजे 734 किलो प्रत्येकी) हाताने ओढत व खांद्यावर भार घेऊन हे साहित्य गडावर पोहोचविले, असे डॉ. राऊत यांनी सांगितले

मंत्री डॉ. राऊत पुढे म्हणाले, रायगडावर सुरक्षित आडोशाच्या ठिकाणी 4 वितरण रोहित्रे बसविण्यात आली आहेत. तसेच भूमिगत वीज वाहिन्यांमार्फत वीज वितरण करण्यात येत असल्याने याचा रायगडाच्या सौंदर्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. कोकणातील व प्रामुख्याने गडावर कोसळणारा मुसळधार पाऊस व वारे यामुळे सुरक्षितता व टिकाऊपणाच्यादृष्टीने विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यात आल्या आहेत. या योजनेमध्ये गडावर नवीन 4 वितरण रोहित्रे, 2 कि.मी. उच्चदाब वाहिनी, 3.05 कि.मी. लघुदाब तारमार्ग वाहिन्यांचे भूमिगत वाहिन्यांमध्ये रूपांतर व 2.5 कि.मी. लघुदाब वाहिनी इत्यादी कामे पूर्ण झाली असून उर्वरीत कामे मार्च 2022 मध्ये पूर्ण करण्याचे नियोजित आहे, असेही डॉ. राऊत यांनी सांगितले.

महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार यांनी हे अतिशय आव्हानात्मक व कठीण काम शिवकार्य म्हणून एकजुटीने व आत्मीयतेने पूर्णत्वास नेले याबद्दल या सर्वांचे अभिनंदन डॉ. राऊत यांनी केले.

000