अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम― विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान राजगृह येथील
७ जुलै मंगळवार रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाहिर निषेध करून तोडफोड करणा-या माथेफिरूंवर तात्काळ गुन्हे दाखल करून दोषींना कठोर शासन करावे अशी मागणी करून काँग्रेसच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी गुरूवार,दिनांक 9 जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांचे मार्फत निवेदन दिले आहे.
बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले “राजगृह” येथे अज्ञात व्यक्तींकडून घराच्या
परिसरातील सीसीटीव्ही कॅमे-यांची तोडफोड केली आहे.तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे.यात घराच्या परिसरातील कुंड्यांचे ही नुकसान झाले आहे.”राजगृह” हे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान
आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते.जगभरातील आंबेडकरी अनुयायी येथे दररोज मोठ्या संख्येने भेटी देतात.आंबेडकरी अनुयायी व सर्व भारतीयांसाठी हे ठिकाण महत्त्वाचे आहे.तसेच “राजगृह” हे आपली आस्मिता देखिल आहे.राजगृहावरील तोडफोडीने देशातील आंबेडकरी चळवळीवर नितांत प्रेम करणा-या जनतेच्या भावना दुखावल्या आहेत.या घटनेचा बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सदरील निवेदनाद्वारे आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.तसेच “राजगृह” येथे तोडफोड करणा-या विकृत विचारसरणीच्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना कठोर शासन करण्यात यावे.दोषींवर कारवाई झाली नाही तर देशासह राज्यभरात मोठा असंतोष पसरेल याची आपण गांभीर्याने दखल घ्यावी अशी नम्र विनंती ही सदरील निवेदनात करण्यात आली आहे.निवेदन देताना बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी,महाराष्ट्र राज्य कापुस उत्पादक व पणन महासंघाचे उपाध्यक्ष अॅड.विष्णुपंत सोळंके,काँग्रेसचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष औदुंबर मोरे,नगरसेवक मनोज लखेरा,राणा चव्हाण,सुनिल व्यवहारे,महेबूब गवळी,जावेद गवळी हे उपस्थित होते.