अंबाजोगाई:आठवडा विशेष टीम―
अंबाजोगाई शहरालगतचे मौजे मोरेवाडी हा स्वतंत्र तलाठी सज्जा करावा अशी मागणी करून विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांना अप्पर जिल्हाधिका-यांमार्फत मोरेवाडी ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.
मोरेवाडी ग्रामस्थांनी विभागीय आयुक्त,औरंगाबाद यांना सोमवार,दिनांक 6 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात जिल्हाधिकारी कार्यालय बीड महसूल मंडळाची पुनर्रचना अंतिम अधिसूचना क्र.२०१३/म.शा.का./ज.मा १/ सी.आर ५४५ जिल्हाधिकारी कार्यालय बीड,दि.०१/०६/२०१७ आणि ग्रामपंचायत कार्यालय,मोरेवाडी ता.अंबाजोगाई जा.क्र १७३/२०२० दि.१०/०२/२०२० चा संदर्भ देत मौजे मोरेवाडी (ता.अंबाजोगाई जि.बीड) गावाकरिता स्वतंञ तलाठी सज्जा करावा अशी मागणी केली आहे.निवेदनात नमुद केले आहे की,आम्ही मोरेवाडीचे गांवकरी नम्र विनंती करतोत की,महाराष्ट्र शासनाच्या १९७५ च्या अधिसूचनेनुसार मोरेवाडी या गावास स्वतंत्र महसुली गावचा दर्जा देण्यात आलेला आहे.तरी पण,अद्याप मोरेवाडी हे गांव तलाठी सज्जा अंबाजोगाईलाच जोडलेले आहे.तलाठी सज्जा अंबाजोगाई मध्ये अंबाजोगाई व आजूबाजूच्या परिसरातील ९ गांवे जोडलेली आहेत.शिवाय कधी कधी इतर ५-६ गावचा कामाचा बोजा अंबाजोगाईच्या तलाठी महोदयांकडे असतो.त्यामुळे आम्हां शेतक-यांची कामे वेळेवर होत नाहीत.७/१२,८/अ काढणे, ७/१२ ऑनलाईन करणे,फेरफार करणे ही कामे तर वेळेवर होतच नाहीत आणि शासकीय योजनांचा लाभ पण,आम्हां सर्व शेतक-यांना होत नाही.बरेच शेतकरी हे शासकीय लाभांपासून वंचित राहतात. कार्यालयात विचारणा केली तर अनेकदा उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात.७/१२ ऑनलाईन करणे व फेरफार करण्यासाठी दोन-दोन वर्षे तलाठी महोदयांकडे फे-या माराव्या लागतात.तरी सुद्धा कामे होत नाहीत.म्हणून आम्ही गावक-यांनी ग्रामसभेमध्ये तलाठी सज्जा स्वतंत्र करणे विषयी ठराव घेवून आपणाकडे ग्रामपंचायत तर्फे जा. १७३/२०२० ने पाठविला आहे व त्या सोबत मा.जिल्हाधिकारी बीड यांची अंतिम अधिसूचना प्रत सोबत जोडली आहे.त्या अधिसूचनेमध्ये मोरेवाडी गांवाला स्वतंत्र तलाठी सज्जा करण्याविषयी निर्देशित केले आहे.पण,अद्याप आमच्या विनंतीचा शासनाकडून विचार करण्यात आलेला नाही.करिता आम्ही मोरेवाडीचे सर्व
गांवकरी कळकळीची विनंती करतोत की, शासनाच्या अधिसूचनेनुसार मोरेवाडी,जोगाईवाडी, चतुरवाडीला एक स्वतंत्र तलाठी सज्जा करावा व तलाठीचे पद निर्माण करून आम्हाला न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.सदरील निवेदन हे राज्याचे महसुलमंत्री,आमदार संजयभाऊ दौंड, अप्पर जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी,तहसिलदार अंबाजोगाई यांना माहितीस्तव दिले आहे.निवेदनावर
काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष वसंतराव मोरे,अविनाशराव मोरे,ज्ञानोबा चव्हाण, चंद्रकांत मोरे,धनराज मोरे,आप्पासाहेब मोरे, श्रीकिसन मोरे,सुदामराव मोरे यांचेसह शंभरच्या जवळपास गावक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.
विभागीय आयुक्तांनी न्याय द्यावा
1975 ला अंबाजोगाईचे विभक्तीकरण झाले. त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे कुरणवाडी ,शेपवाडी ,मोरेवाडी ,जोगाईवाडी ,काळवीट तांडा, दस्तगीरवाडी-मगरवाडी ही 6 गावे महसुली गावे झालेली आहेत.यापूर्वीच जर सदर गावात स्वतंत्र तलाठी सज्जे निर्माण केले असते तर आज शेतक-यांची कामे वेळेवर झाली असती.७/१२,८/अ काढणे,७/१२ ऑनलाईन करणे,फेरफार करणे ही कामे ही वेळेवर होवून शासकीय योजनांचा लाभ सर्व शेतक-यांना मिळाला असता.शेतक-यांचा ञास कमी झाला असता.म्हणून आता तरी विभागीय आयुक्त यांनी याप्रश्नी न्याय देवून मोरेवाडी या गावाकरीता स्वतंत्र तलाठी सज्जा निर्माण करावा.
―वसंतराव मोरे (माजी तालुकाध्यक्ष,भारतीय राष्ट्रीय काँग्रेस.)