सोयगाव:ज्ञानेश्वर धोंडू पाटील―
शासकीय कार्यालयातील मंजूर पदांच्या १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेला नुकतीच मान्यता दिली आहे.यासाठी मात्र दि.३१ जुलैची डेडलाईन देण्यात आली आहे.सोयगावातील शासकीय कार्यालयात बदली प्रक्रियेला वेग आला असून पात्र असलेल्या परंतु मंजूर पदांच्या १५ टक्केच कर्मचाऱ्यांना बदलीसाठी पात्र ठरविण्यात येणार असल्याचा निकष शासनाने घालून दिलेला असल्याने यामध्ये कुणाची लॉटरी लागते हे महत्वाचे आहे.
कोरोना संसर्गाच्या धामधुमीत बंद असलेली कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बदली प्रक्रियेला शासनाने हिरवा कंदील दिला असून यामध्येही बंधन घालून दिलेले आहे.आधीच सोयगावात प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असतांना त्यातच मंजूर पदांच्या १५ टक्के कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना पुन्हा बदलीसाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.त्यासाठी जिल्हा पातळीवरून सोयगावातील प्रत्येक शासकीय कार्यालयात मंजूर पदे आणि रिक्त पदांची तातडीने माहिती मागविण्यात आली आहे.
सेवाजेष्ठेतेनुसार ठरणार पात्रता―
शासकीय कार्यालयांच्या मंजूर पदांपैकी १५ टक्केच कर्मचारी आणि अधिकारी बदलीसाठी पात्र ठरणार असल्याने सेवाजेष्ठेतेनुसार कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना बदलीसाठी पात्र ठरविणार असल्याची चर्चा आहे.त्यामुळे ऐन अडचणीच्या काळात सोयगावातून कोणाकोणाची बदली होणार याकडे लक्ष लागून आहे.