कर्मचाऱ्यांना जीव मुठीत धरुन करावे लागते काम
परळी वैजनाथ:आठवडा विशेष टीम― राजकीय दृष्ट्या बीड जिल्ह्यात महत्वाचे शहर समजल्या जाणाऱ्या आणि राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री ना धनंजय मुंडे यांचे मुख्यालय असलेल्या परळी शहरातील वीज वितरण च्या उप – विभाग कार्यालयात सावळागोंधळ चालला असून ट्रांसफार्मरच्या देखभाली चे काम काम करण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. हा तुटवडा येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांच्या आशीर्वादाने निर्माण झाला असून गुत्तेदार केवळ कागदोपत्री वस्तूंचा पुरवठा करीत बिले उचलीत आहेत. ट्रांसफार्मरचे काम करण्यासाठी कर्मचार्यांना साहित्य उपलब्ध नसल्याने त्यांना जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. यामुळे कधी कोणती अप्रिय घटना घडेल हे सांगता येणे कठीण आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड जिल्ह्यामध्ये लोकसंख्या, व्यापार, उद्योग बाबतीत बीड नंतर परळी शहराचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. तसे पाहता शहर राजकीयदृष्ट्या बीड जिल्ह्यामध्ये अतिमहत्वाचे समजले जाते. कारण परळी शहर हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे सामाजिक न्याय तथा विशेष सहाय्य मंत्री ना धनंजय मुंडे आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खासदार प्रीतमताई मुंडे यांचे मुख्यालय आहे. त्यामुळे परळी शहरात लागणाऱ्या कोणत्याही वस्तूचा पुरवठा होऊ शकत नाही असे होत नाही. मात्र वीज वितरण च्या परळी उपविभाग कार्यालयाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांच्या आशीर्वादाने या ठिकाणच्या कार्यालयाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. सध्याची परिस्थिती पाहता परळी शहरातील जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के ट्रांसफार्मर वर काम करण्यासाठी साहित्यच उपलब्ध नाही. साहित्य नसल्याकारणाने कर्मचाऱ्यांना उपलब्ध तुटपुंजा साहित्यावर काम करावे लागत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता वीज वितरणच्या उपविभाग कार्यालयात किटकॅट, केबल, लग्ज, नट बोल्ट, फ्युज वायर, डिस्क आदी महत्त्वाच्या सामानाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे वास्तविक पाहता ट्रांसफार्मर वर काम करण्यासाठी किंवा परळी शहरातील विज अखंड चालू ठेवण्यासाठी ह्या वस्तूंचा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र या ठिकाणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांच्या दुर्लक्षामुळे आणि सदर वस्तूचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांना आशीर्वाद असल्याकारणाने ह्या ठिकाणी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ह्या वस्तूच नाहित. अधिक माहिती घेतली असता सदर वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी कार्यालय आदेश काढतो मात्र हा आदेश केवळ कागदोपत्री असून वस्तूंचा पुरवठाही कागदोपत्रीच होतो. परिणामी वस्तूंचा पुरवठा करणारा पुरवठादार गुत्तेदार हे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने बील उचलून दुसरी ऑर्डर काडण्याच्या मागे लागतात. आज परळी शहरात प्रत्यक्षात फिल्डवर काम करणाऱ्या लाईनमन, वायरमन, आणि हेल्पर यांना वस्तूंचा पुरवठा नसल्याकारणाने जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. काम करत असताना कधी एखादी मोठी अप्रिय घटना घडेल हे सांगता येणे कठीण आहे. काम करण्यासाठी योग्य वस्तूंचा पुरवठा नसल्याकारणाने तुटपुंज्या आणि मिळेल त्या साहित्यावर तात्पुरत्या स्वरूपात कर्मचाऱ्यांना कामे करावी लागत आहेत. ही कामे फार काळ टिकत नसल्याकारणाने कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. वेळप्रसंगी नागरिक त्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळही करतात अशा रीतीने अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांच्या आशीर्वादाने कर्मचाऱ्यांना एक प्रकारच्या मानसिक त्रासालाही तोंड द्यावे लागत आहे.
ना धनंजय मुंडे यांनी लक्ष घालावे
वीज वितरण उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांनी परळीचा पदभार स्वीकारल्यापासून कार्यालयास अवकळा आली असून सावळा गोंधळ सुरू आहे. ट्रांसफार्मर चे काम करण्यासाठी आवश्यक वस्तू उपलब्ध नसून त्याकडे त्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांनी याबाबतची गंभीर दखल घेऊन अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर यांची कान उघडणी करावी अशी मागणी शहरातून होत आहे.
ऊठसूट नागपूरला
परळी वीज वितरणच्या उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत अंबाडकर हे मूळचे नागपूरचे आहेत. सध्या राज्यामध्ये कोरोना व्हायरसची गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. तसेच लाॅक डाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ते मुख्यालयात राहण्याऐवजी वेळोवेळी नागपूरला जातात. दहा – दहा, पंधरा – पंधरा दिवस येत नाहीत. परळी तालुक्यात विजेची समस्या निर्माण झालीच आणि जर एखाद्याने विचारलेच ते स्पष्टपणे खोटं बोलून मी परळीतच आहे असे सांगतात. आज पर्यंत प्रशांत अंबाडकर कितीवेळा नागपूरला गेले आणि त्यांनी क्वारंनटाईनचे नियम पाळलेत का याचीही चौकशी व्हावी अशीही मागणी होत आहे.